एनएओचा सत्कार समारंभ : डॉ. विनायक देशपांडे यांचे प्रतिपादन नागपूर : देशभरात अंधांची फार मोठी संख्या आहे. अशा रुग्णांवर उपचार करून, त्यांना दृष्टी प्रदान करणे फार मोठे आव्हान आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकासित झाले आहे. त्यानुसार उपचार होत आहे. परंतु तरीही लाखो रुग्ण अंधत्वाचा सामना करीत आहे. देशात ‘आय बँका’ तयार होत आहे. पण त्यांची संख्या फार कमी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. नागपूर अकॅडमी आॅफ आॅफ्थालमोलॉजी (एनएओ) असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचा रविवारी जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हॉटेल प्राईड येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनएओचे अध्यक्ष डॉ. अनिल बजाज होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक व एनएओच्या सचिव डॉ. पल्लवी अलसी उपस्थित होत्या. यावेळी डॉ. देशपांडे यांच्या हस्ते एनएओच्या माजी अध्यक्षांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून, त्यांचा गौरव करण्यात आला. यात डॉ. प्रफुल्ल मोकदम, डॉ. सतीश सुळे, डॉ. एस. व्ही. जोशी, डॉ. सुधा सुतारिया, डॉ. पी. व्ही. कोरान्ने, डॉ. माला कांबळे, डॉ. आनंद पांगारकर, डॉ. श्रीकांत अंधारे व डॉ. मुकुंद ओक आदींचा समावेश होता. डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, आरोग्य हा प्राथमिक विषय आहे. डॉक्टरची या क्षेत्रात फार मोठी भूमिका आहे. मात्र त्यांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तत्पूर्वी डॉ. योगेश शहा यांनी डोळ्यांच्या आजारावरील शस्त्रक्रियेसंबंधी सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. वत्सल पारेख यांनी मधुमेहावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रशांत अग्निहोत्री व डॉ. अजय सूद यांनी केले. या समारंभानंतर शहरातील प्रख्यात गायक सुनील वाघमारे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. सत्कार समारंभाला उपस्थित सर्व डॉक्टरांनी या संगीत मैफिलीचा आनंद लुटला. (प्रतिनिधी)
अंधत्व मोठे आव्हान
By admin | Published: July 28, 2014 1:33 AM