नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुषांच्या वॉर्डात शुक्रवारी रात्री १२ वाजता विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. वॉर्डात असलेल्या ६० रुग्णांना तातडीने वॉर्डाबाहेर काढले. सर्पमित्राने रुग्णाच्या गादी खाली लपलेल्या सापाला पकडल्याने मोठा अनर्थ टळला.
प्रादेशिक मनोरुग्णलयातील सुरक्षा रक्षकच दारूच्या पार्ट्या करीत असल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. ‘लोकमत’च्या या वृत्ताने सुरक्षेची व्यवस्था चोक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता वॉर्डात निघालेल्या विषारी सापामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
४३ एकर परिसरात पसरलेल्या मनोरुग्णालयाचा परिसर झाडा झुडूपाने वेढलेला आहे. प्राप्त माहितीनुसार, वॉर्ड क्र. १५ मध्ये, शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास एका रुग्णाला साप दिसला. त्याने तातडीने याची माहिती अटेन्डंटला दिली. त्यावेळी या वॉर्डात ६० पुरुष रुग्ण होते. त्याने प्रसंगावधान राखून सर्व रुग्णांना बाहेर काढले. याची माहिती ड्युटीवर असलेल्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीने सर्पमित्राला बोलविले. रुग्णांसाठी जमीनीवर टाकण्यात आलेली एक एक गादी बाजूला करीत सापाचा शोध घेणे सुरू केले. काही वेळातच एका गादीच्या खाली काहीतरी वळवळताना दिसून आले. गादी बाजूला करता साप फणा काढून बसला. सर्पमित्राने आपल्या काठीच्या मदतीने मोठ्या शिताफिने सापाला पकडले. त्यानंतर अटेन्डंट व इतर कर्मचाऱ्याने संपूर्ण वॉर्डाचा परिसराची पाहणी पाहणी केली, त्यानंतरच रुग्णांना वॉर्डात घेतले.