नागपूर : काही महिन्यांअगोदर ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’ चालविणाऱ्या नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १.९१ किलो ‘एम.डी.’ (मेफेड्रोन) जप्त केले आहे. संबंधित ड्रग्जची किंमत जवळपास १.९१ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला खबऱ्यांकडून शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ‘एम.डी.’चा पुरवठा होणार असल्याची ‘टीप’ मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा मार्गावर सापळा रचला. पोलिसांनी दुचाकीवरून येणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोपेडची तपासणी केली असता ४ झिपलॉक पाकिटांमध्ये १.९११ किलो ‘एमडी’ आढळले. पोलिसांनी लगेच कुणाल गोविंद गभणे (१८, प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर) व गौरव संजय कालेश्वरराव (२२, प्रेमनगर, शांतीनगर) या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे तीन मोबाईल, रोख पाच हजार रुपये रोख, दुचाकी असा एकूण १ कोटी ९१ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींविरोधात सोनेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, राहुल डोंगरे, विकास दांडे, बलराम झाडोकर, प्रमोद धोटे, सुनिल इंगळे, समाधान गिते, सुशील गवई, विवेक अढाऊ, मनोज नेवारे, सुरज भानावत, चंद्रशेखर राघोर्ते, अनंता क्षीरसागर, सहदेव चिखले, मंगेश मापारी, रोहीत काळे, राहुल पाटील, मिथुन नाहेक, पराग ढोक, अनुप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.