नागपूर-
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील संकटं काही कमी होताना दिसत नाहीत. चौकशांचा ससेमिरा लागलेला असताना दुसरीकडे नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानावर आज वादळी वाऱ्यामुळे भलं मोठ्ठं झाड कोसळलं. झाड इतकं मोठं होतं की देशमुखांच्या बंगल्याचं बरंच नुकसान झालं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनिल देशमुखांच्या निवासस्थाना शेजारीच रणजित देशमुख यांचंही निवासस्थान आहे. झाड कोसळल्याच्या दुर्घटनेनं रणजित देशमुखांच्याही घराचं नुकसान झालं आहे.
नागपूरात आज दुपारी साडेचार वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. त्यानंतर अनिल देशमुख आणि रणजित देशमुखांच्या निवासस्थानाबाहेर असलेलं एक भलं मोठ्ठं झाड कोसळलं. झाड थेट अनिल देशमुख आणि रणजित देशमुखांच्या निवास्थानावर कोसळल्यामुळे बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं नुकसान झालं आहे. तसंच सज्जा आणि भिंतीलाही तडे गेले आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून झाड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
नागपूरच्या सिव्हिल लाइन येथील अनिल देशमुख यांच्या याच निवासस्थानावर ईडीकडून दोनवेळा धाड घातली होती. ईडीनं सीआरपीएफच्या सशस्त्र जवानांना धाड टाकताना सोबत आणलं होतं. तर घराला पोलिसांनी वेढा घातला होता. सध्या अनिल देशमुख मुंबईत कारागृहात असून खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी मागितली होती. पण न्यायालयानं ती फेटाळून लावत मुंबईतील जे.जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत.