नागपूर - नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची चिन्हे आहेत. येथे भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने भाजपामधून आलेले रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आता काँग्रेसने पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. तसे पत्र प्रदेश काँग्रेस कमिटीला प्राप्त झाले आहे.
नागपूर विधान परिषदेमध्ये निवडणुकी मध्ये काँग्रेसने आपल्या अधिकृत अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिल्याचा पत्र प्रदेश काँग्रेस कमिटीला मिळाले आहे. काल प्रदेश काँग्रेस कमिटीने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्याच्या मागणीचा पत्र केंद्रीय कमिटीकडे पाठवले होते. आज प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या प्रस्तावाला केंद्रीय कमिटीने मंजुरी दिली, अशी चर्चा आहे.
दरम्यान, याबाबत रविभवन येथे काँग्रेसची बैठक झाली या बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत क्रीडा मंत्री सुनील केदार व जिल्ह्यातील इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते सुनील केदार यांनी या प्रश्नी निर्माण झालेला सस्पेन्स कायम ठेवला आहे. सुनील केदार म्हणाले की, मी याबाबत प्रथमच प्रसारमाध्यमांमधून ऐकत आहे. आतापर्यंत अशी कुठलीही गोष्ट माझ्या कानावर आलेली नाही. मला याची अजिबात कल्पना नाही. दरम्यान, याबाबत काही निर्णय झाल्याच अधिकृत माहिती प्रथम सुनील केदारच माध्यमांना सांगेल, असेही त्यांनी सांगितले.