रामटेक : अंधारात चालकाच्या लक्षात न आल्याने माेटरसायकल महामार्गालगतच्या लाेखंडी कठड्यावर आदळली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील चाेरखुमारी शिवारात साेमवारी (दि. १९) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
अरविंद वाघाडे (३९, रा. दुधाळा, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. ते जीपचालक म्हणून काम करायचे. त्यांनी त्यांची जीप पवनी (ता. रामटेक) येथे उभी केली आणि एमएच-४०/जे-३१२६ क्रमांकाच्या माेटरसायकलने दुधाळा येथे येत हाेते. ते चाेरखुमारी शिवारात येताच महामार्गालगतचे लाेखंडी कठडे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी माेटरसायकल त्या कठड्याला धडकली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.