सैयद मोबीन
नागपूर : आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात राज्य सरकारने बाईक टॅक्सीच्या संचालनास परवानगी दिली नसल्याने, राज्यात ही सेवा अवैध आहे. त्याच कारणाने ओला, उबरच्या बाईक टॅक्सीवर शहरात कारवाई मोहीम आरंभली असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
शहरातील अरुंद गल्लीबोळांतून कॅब टॅक्सी पोहोचू शकत नसल्याने बाईक टॅक्सी प्रभावी ठरू शकते आणि त्याअनुषंगाने भविष्यात या नव्या प्रवासी वाहतूक संचालनास प्रोत्साहन देण्याची भावना केंद्र सरकार आणि केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती. बाईक टॅक्सीला परवानगी देणारे मिझोरम हे देशातील पहिले राज्य ठरले असून, या राज्यात २०१६ पासून बाईक टॅक्सी रस्त्यांवर दिसत आहे.
प्रवाशांची सुरक्षा धोक्यात!
बाईक टॅक्सीला परवानगी नसल्याने शहरात कारवाई केली जात आहे. बाईक टॅक्सी अवैध असल्याने, या टॅक्सीचा रेकॉर्ड आरटीओकडे राहत नाही. यामुळे, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ही कारवाई प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केली जात आहे.
- हर्षल डाके, एआरटीओ, नागपूर शहर
दुसऱ्या दिवशी ७ गाड्यांवर कारवाई
शहरात सोमवारपासून सुरू झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने मंगळवारी ७ गाड्यांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी १३ बाईक टॅक्सींवर कारवाई झाली होती. आतापर्यंत २० बाईक टॅक्सींवर कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी नागपूर शहर आरटीओ रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात सहायक क्षेत्रीय परिवहन अधिकारी हर्षल डाके, मोटर वाहन निरीक्षक (आयएमव्ही) आनंद मोड, आयएमव्ही रवींद्र राठोड, आयएमव्ही विजयसिंह राठोड, आयएमव्ही अमित कराड, आयएमव्ही शिवज्योती भामरे यांच्या पथकाने कारवाई केली.
ही आहेत कारणे-
- राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी नसल्याने ही सेवा अवैध आहे.
- बाईक टॅक्सीचा रेकॉर्ड आरटीओकडे नसतो.
- बाईक टॅक्सी चालकाची माहिती नसते.
- खासगी बाईकचा व्यावसायिक उपयोग करता येऊ शकत नाही.
- राज्यात ही सेवा वैध झाल्यास बाईक टॅक्सीचा रेकॉर्ड राहील.
या राज्यांत बाईक टॅक्सीला परवानगी
- मिझोरम
- पश्चिम बंगाल
- हरियाणा
- गोवा
..............