नागपूर : प्रेयसी आणि गांजावर खर्च करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन व त्याच्या साथीदाराला वाडी पोलिसांनी पकडले आहे. आरोपींकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी रमजान उर्फ मुनीर इकराम अन्सारी (१९, पाचपावली) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराची चौकशी सुरू आहे. आरोपींकडून दोन लाख रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
वाडी पोलिसांकडे चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अल्पवयीन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत वाहन सोडून जाताना दिसली. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने अल्पवयीन मुलापर्यंत पोहोचले. त्याच्यावर वाहनचोरीचा गुन्हा दाखल असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रमजान अन्सारीच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दोघेही व्यावसायिक वाहनचोर आहेत. त्यांना गांजाचे व्यसन असून गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी ते वाहनचोरी करतात. रमजानच्या गर्ल फ्रेंडला फिरण्यासाठी नवीन मॉडेलची दुचाकी हवी होती. ती खरेदी करता न आल्याने आरोपींनी नवीन मॉडेल्स चोरण्यास सुरुवात केली. आरोपी संधी पाहून दुचाकी चोरायचे. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो मित्रांकडे दुचाकी चालवण्यासाठी द्यायचा. चौकशीअभावी आरोपींकडून गांजा विक्रेत्यांचाही छडा लावता आला नाही. ही कारवाई पीआय प्रदीप रायनवार व त्यांच्या पथकाने केली.
यूट्युबवरील व्हिडीओ पाहून चोरी
चोरीत सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाने यूट्युबवरील व्हिडीओ पाहून नवीन दुचाकी अनलॉक करण्याचे धडेच घेतले. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले व त्याने आणखी दुचाकी चोरण्यास सुरुवात केली.