योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत एमडी खरेदी विक्रीचे प्रमाण वाढत असून अगदी दुचाकीवरदेखील याची तस्करी करण्यात येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक दुचाकीचालक ड्रग पेडलर निघाला व त्याच्या ताब्यातून ११ लाखांची एमडी पावडर जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
शहरात दुचाकीतून एमडीची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. गुरुवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांनी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालकृष्ण नगर येथे एका संशयित वाहनचालकाला थांबविले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ११०.७२ ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्या पावडरची किंमत ११.०७ लाख इतकी होती. सूरज प्रमोद गजभिये (३४, अर्चना रेसिडेन्सी, गोपालकृष्णनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एमडी पावडर, मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने पंकज साठवणे (सोमवारी क्वॉर्टर) याच्या मदतीने अंमली पदार्थांची खरेदी विक्री करत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला व त्याला नंदनवन पोलीस ठाण्याच्या हवाली देण्यात आले. पंकज साठवणे याचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, सिद्धार्थ पाटील, विवेक अढाऊ, मनोज नेवारे, नितीन साळुंके, रोहीत काळे, सुभाष गजभिये, अनुप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.