नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) औषधे व साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्याचे गेल्या दीड वर्षांपासून तब्बल १६ कोटी रुपयांची बिल थकले आहे. अपुरे साहित्य व औषधांमुळे मेडिकलला रुग्णसेवा देणे कठीण जात आहे. छोट्या-छोट्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनाही पदरमोड करून साहित्य व औषध विकत घ्यावे लागत आहे. उपराजधानीतील शासकीय रु ग्णालयांची परिस्थिती भयंकर आहे. डॉक्टर्सची अपुरी संख्या, त्यामुळे तातडीची आॅपरेशने करायलादेखील आठवड्याचा अवधी लागतो. स्वच्छता, साधने यांची भीषण कमतरता आहे. दुसरीकडे पंचतारांकित, वातानुकूलित, चकचकीत खासगी इस्पितळांमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. यातच गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलमध्ये औषधांच्या थकीत बिलांमुळे औषधाचा खर्च रु ग्णाच्या नातेवाईकांनाच करावा लागत असल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. मेडिकलला २२ ते २५ वेगवेगळ्या औषध पुरवठादार कंपन्यांकडून औषधे व साहित्याचा पुरवठा होतो. या कंपन्यांना गेल्या दीड वर्षांपासून जुनी बिले अदा करण्यात आलेली नाहीत. ही थकबाकी जवळजवळ १६ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे पुरवठादारांनी औषधे व साहित्य पुरविण्यात असमर्थता दर्शविल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी रुग्णांवर पदरमोड करून औषधे व शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य खरेदी करून आणावे लागत आहे. यात ग्लोव्हज पासून ते टाके मारण्यासाठी धागे आणि अन्य शस्त्रक्रिया साहित्य देखील स्वत:च खरेदी करून आणावे लागत असल्याची माहिती आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी शुक्रवारी मेडिकलला धावती भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ही बाब त्यांच्या कानावर घातली. या संदर्भात जुनी बिले पुरवठादार कंपन्यांना अदा करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)
१६ कोटींचे बिल थकले
By admin | Published: May 16, 2015 2:32 AM