लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. नागरिकांवर ७ कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व्यापक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु जे ग्राहक थकबाकी ठेवत नाहीत, वेळेवर बिल भरतात त्यांच्यासाठी बिल देणे कठीण झाले आहे. ऑनलाईन बिल देण्यासाठी असलेले गेटवे बंद झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
महावितरणच्या वेबसाईटवर आणि अॅपवर बिलाचे पेमेंट करण्यासाठी दोन गेटवे आहेत. सर्वात आधी बिल जंक्शन दिसते. त्यासोबतच बिल डेस्कच्या नावाने आणखी एक गेटवे आहे. बहुतांश ग्राहक बिल जंक्शनचा उपयोग करतात. परंतु मागील दोन दिवसांपासून हे गेटवे बंद आहे. त्यामुळे ग्राहक ऑनलाईन पेमेंट करू शकत नाहीत. महावितरणने आपल्या ग्राहकांना याची माहिती दिलेली नाही. बहुतांश ग्राहकांना याची माहिती नाही की बिल डेस्कच्या नावाने आणखी एक पेमेंट गेटवे आहे. अशा स्थितीत महावितरणला ऑनलाईन मिळणाऱ्या निधीत व्यत्यय येत आहे. यापूर्वीही एका लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट अॅपची सेवा बंद करण्यात आली होती.
लवकरच दूर होणार समस्या
महावितरणच्या मते ही तांत्रिक समस्या आहे. कंपनीच्या मते त्यांच्या वेबसाईटवर दोन पेमेंट जंक्शन आहेत. ग्राहक दुसऱ्या जंक्शनचा उपयोग करू शकतात. ही समस्या दूर करणे त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.