नागपूर : अस्तित्वात नसलेल्या नागपुरातील तीन प्रतिष्ठानांनी बोगसगिरी करून ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ चे रिफंड घेऊन सीजीएसटी विभागाला कोट्यवधीचा चुना लावला आहे. या प्रकरणी डायरेक्टर जनरल ऑफ गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स इंटेलिजेंस (डीजीसीआय) च्या नागपूर झोनल युनिटने गाजियाबाद येथून एका आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या चौकशी दरम्यान आठ अस्तित्व नसलेल्या प्रतिष्ठानांद्वारे २२२.०९ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटचे रिफंड घेतल्याचा खुलासा झाला आहे. डीजीसीआयच्या टीमने बोगस रिफंड घोटाळ्याच्या सूत्रधाराचा छडा लावण्यासाठी फरीदाबाद, गाजियाबाद, नोएडा, गुवाहाटी व चेन्नई येथे छापे टाकले. गाजियाबादमध्ये एक व्यक्ती डीजीसीआय टीमच्या हाती लागली. त्याला अटक करण्यात आली. तो बोगस बिल वनवित असल्याची माहिती आहे. त्याने अस्तित्वात नसलेल्या प्रतिष्ठानांच्या बँक खात्यातून १२३.९७ कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडची रक्कम ट्रान्सफर करून त्याचा वापर केला होता. डीजीसीआय टीमने देशभरातील आठ अस्तित्वात नसलेल्या प्रतिष्ठानांचा पर्दाफाश केला आहे. तपासात निष्पन्न झाले की, या आठ प्रतिष्ठानांनी फसवेगिरी करून इनपुट टॅक्स क्रेडिट नागपुरातील तीन अस्तित्वात नसलेल्या प्रतिष्ठानाला ट्रान्सफर केले होते. या तीन प्रतिष्ठानांनी २१३.६७ कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडची मागणी जीएसटी विभागाच्या हिंगणा कार्यालयाकडे केली होती. डीजीसीआय टीमला या बोगसगिरीचा संशय आल्याने ९० कोटी रुपयांचा रिफंड ट्रान्सफर होण्यापासून थांबविला.