लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस दस्तावेज आणि चोरीने वाळूची (रेती) वाहतूक करणारे टिप्पर चालक आरटीओला दर महिन्याला कोट्यवधी रुपयाची लाच देतात. शहर पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईनंतर ही बाब उघडकीस आली आहे. वाळूमाफिया व त्यांच्याशी संबंधित अधिकारी आता नव्या पद्धतीने कारभार चालवण्याचा प्रयत्न करताहेत. दरम्यान गुन्हे शाखेने वाळू तस्करीत पकडलेल्या व्यावसायिकासह सात आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर सादर करीत तीन दिवसाची पोलीस कोठडी घेतली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेच्या पीआय तृप्ती सोनवणे यांनी सोमवारी रात्री भंडारा रोडवर वाळू माफियांविरुद्ध अभियान चालवित पाच टिप्पर जप्त केले होते. यात पोलिसांनी ७ आरोपींना अटक करून ८० लाखाचा माल जप्त केला. आरोपीविरुद्ध चोरी, फसवणूक आणि गुन्हेगारी षडयंत्र अंतर्गत गुन्हा दाखल करून याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सर्व टिप्पर ओव्हरलोड होते. तसेच एकाच रॉयल्टीवर अनेक फेऱ्या मारून महसूल चोरी करीत हाेते. कठोर कारवाई नंतरही वाळू माफियांची हिंमत पाहून पोलीसही आश्चर्यचकित आहेत.
सूत्रानुसार वाळूच्या तस्करीत सर्वाधिक योगदान आरटीओचे आहे. जिल्ह्यात २२०० टिप्पर आणि ट्रक वाळू किंवा गिट्टी-बोल्डरची वाहतूक करतात. १७०० वाहन दररोज वाळू चोरी होते. बोगस दस्तावेजाच्या मदतीने ही वाहने संचालित होतात. एक वाहनाच्या मोबदल्यात आरटीओ अधिकाऱ्याला ११ हजार रुपये दर महिन्याला दिले जाते. याच प्रकारे वाहतुकीसाठी ३ हजार छोटी वाहने आहे. विना दस्तावेज लोखंड व इतर सामग्रीच्या वाहतुकीसाठी उपयोगात आणलेल्या या वाहनांकडून दर महिन्याला ५ हजार रुपये (प्रत्येकी वाहन) वसुली केली जाते. याप्रकारे आरटीओला दर महिन्याला वाळू माफियांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली होत असते. आरटीओच्या अधिकाऱ्यांनाही ही कमाई बंद व्हावी, असे वाटत नाही. यामुळे पोलिसांकडून कठोर कारवाई केल्यानंतरही वाळू चोरी व ओव्हरलोडिंग सर्रासपणे सुरु आहे.
ओव्हरलोड वाहनांची वाहतूक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओव्हरलोड वाहनांकडून दहापट दंड करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरही जिल्ह्यात सर्रासपणे वाळूचे ओव्हरलोड वाहने चालत आहेत. टोलनाक्यांना ओव्हरलोड वाहनांचे वजन करून अतिरिक्त माल उतरवून ठेवण्याचे अधिकार दिले गेले आहे. परंतु टोल नाक्यावरील कर्मचारी वाहन चालकाकडून पैसे घेऊन वाहन सोडून देतात. त्याचप्रकारे आरटीओ सुद्धा मूक दर्शक बनले आहे. त्यामुळे वाळू माफियांचे काम सोपे होते. गुन्हे शाखेच्या तपासात या बाबतचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी आपले एक पथक तपासासाठी गोंदियाला पाठवले आहे. पोलीस जप्त दस्तावेजाच्या तपासासोबतच आरोपींशी संबंधित लोकांचीही विचारपूस करीत आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर पारडी पोलीसही सतर्क झाले आहे. त्यांनीही वाळू माफीयाविरुद्ध कारवाई केली आहे.
सीडीआरवरून सूत्रधाराचा शोध
गुन्हे शाखेतर्फे अटक करण्यात आलेल्या आरोपी व त्याच्याशी संबंधित लोकांच्या सीडीआरची तपासणी केली जात आहे. याद्वारे सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. याचे संकेत मिळताच आरटीओ अधिकाऱ्यांचे दलाल भूमिगत झाले आहेत. एका नेत्याशी संबंधित दलाल काही दिवसांपासून दुरावला होता. ताज्या कारवाईनंतर त्याने आरटीओ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून १०० वाहनावर कारवाईपासून सूट मिळवल्याची माहिती आहे.