लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेस्थानकावर अनेकजण नातेवाईकांना सोडण्यासाठी येतात. त्यासाठी ते प्लॅटफॉर्म तिकीट काढतात. परंतु मागील सात महिन्यांपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद आहे. त्यामुळे रेल्वेला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सारे काही सुरळीत होते. अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे २३ मार्च २०२० पासून फ्लॅटफार्म तिकीट विक्रीसुद्धा बंद झाली. त्यानंतर हळूहळू जीवनमान सुरळीत झाले. लोक घराबाहेर पडू लागले. रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरू झाली. विशेष रेल्वेगाड्या सुरू झाल्या. परंतु २०१९ या वर्षाचा विचार केल्यास १८ लाख ८९ हजार तिकिटांची विक्री झाली. त्या माध्यमातून रेल्वेला वर्षभरात १ कोटी ८८ लाख ९९ हजार रुपयांचा महसूल मिळाला. अर्थात महिन्याला दीड लाखांचे तिकीट तर महिन्याकाठी १५ लाखांचा महसूल रेल्वेला मिळाला. २३ मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद आहे. या सात महिन्यात जवळपास ११ लाखांच्यावर तिकीट विक्री झाली असती तर जवळपास एक कोटीच्यावर महसूल मिळाला असता.
अद्याप निर्णय नाही
कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंगसाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद आहे. मुख्यालयातून सूचना प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग