लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. अडीच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या शुल्कातून विद्यापीठाला कोट्यवधींचा महसूल प्राप्त झाला. दुसरीकडे कोरोनामुळे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांसाठी एकाही विद्यार्थ्यांने फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. उन्हाळी २०१८ पासून ते उन्हाळी २०२० पर्यंत नागपूर विद्यापीठात किती विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले, त्यातून किती महसूल प्राप्त झाला, ऑनलाईन परीक्षेच्या फेरमूल्यांकनासाठी किती अर्ज आले इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले. नागपूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव बिंदुप्रसाद शुक्ला यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळी २०१८ ते उन्हाळी २०२० पर्यंतच्या परीक्षांसाठी एकूण १ लाख ९४ हजार १७५ अर्ज आले. यातून विद्यापीठाला ३ कोटी १४ लाख ५६ हजार ४३२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१८-१९ या वर्षात फेरमूल्यांकनाच्या शुल्कापोटी सर्वाधिक १ कोटी ६६ लाख ९२ हजार ७३७ रुपये प्राप्त झाले.
ऑनलाईन परीक्षेमुळे शुल्क घटले
कोरोनामुळे विद्यापीठाने उन्हाळी २०२० च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या. तर काही ऑफलाईन पद्धतीने झाल्या होत्या. ऑफलाईन माध्यमातून परीक्षा दिलेल्या १ हजार २४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामुळे विद्यापीठाला मिळणारे शुल्कदेखील घटले.
वर्षनिहाय महसूल
वर्ष – महसूल
२०१८-१९ – १,६६,९२,७३७
२०१९-२० – १,४५,५९,७००
२०२०-२१ – २,०३,९९५
असे आले फेरमूल्यांकनाचे अर्ज
परीक्षा – फेरमूल्यांकनाचे अर्ज
उन्हाळी २०१८ – ३८,९९६
हिवाळी २०१८ – ४५,१५९
उन्हाळी २०१९ – ४५,५००
हिवाळी २०१९ – ६३,२७५
उन्हाळी २०२० – १,२४५