जगदीश जोशी
नागपूर : भिसीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने इतवारीतील एका कॉस्मेटिक व्यापाऱ्याने कोट्यवधींनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. काही दिवसापूर्वी हा व्यापारी भूमिगत झाल्यानंतर पैसे मागणाऱ्यांची गर्दी झाल्याने ही घटना उघडकीस आली.
शांतिनगर येथील रहिवासी असलेल्या या व्यापाऱ्याचे इतवारीत कॉस्मेटिक सामानाचे दुकान आहे. तो व्यवसायासह समाजसेवेचे काम करतो. एका मोठ्या अध्यात्म गुरूच्या संस्थेच्या माध्यमातून तो नागरिकांना ध्यान करण्याची कला शिकवितो. या कलेची आवड असलेले अनेक युवा व्यापारी त्याच्याशी जोडल्या गेले.
दरम्यान, त्याने भिसीचा व्यवसाय सुरू केला. भिसीत गुंतवणूक करणाऱ्यांचा गट असतो. प्रत्येक सदस्याला एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. ड्रॉ काढून ही रक्कम एखाद्या सदस्याला देण्यात येते. सुरुवातीला त्याने ड्रॉ काढून रक्कम दिल्यामुळे इतर व्यापाऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. इतवारीचे अनेक व्यापारी त्याच्याशी जोडल्या गेले. त्यांनी पाच ते दहा लाखाची गुंतवणूक केली. भंडारा मार्गावरील एका मोठ्या कॉस्मेटिक व्यापाऱ्यानेही सव्वा कोटीचा डाव लावला.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी भिसीचा ड्रॉ काढणे बंद झाल्यामुळे व्यापारी चिंतेत सापडले. त्यांनी कॉस्मेटिक व्यापाऱ्याला प्रश्न केला असता, त्याने दुसऱ्याच्या नावाने भिसी निघाल्याची माहिती दिली. भिसीत असलेल्या व्यापाऱ्यांना त्याने सांगितलेली नावे माहीत नव्हती. संशय आल्यामुळे इतर व्यापारी त्याला पैशासाठी दबाव टाकू लागले.
परंतु चार ते पाच महिन्यापासून हा कॉस्मेटिक व्यापारी गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन फिरवीत होता. त्याने आपले घर दीड कोटी रुपयात विकून पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसापूर्वी त्याच्या घरावर शासकीय बँकेचे एक कोटीचे कर्ज असल्याची माहिती इतर व्यापाऱ्यांना समजली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्याच्यावर दबाव टाकणे सुरू केले. त्यामुळे १५ दिवसापूर्वी तो गायब झाला. त्याचे दुकान त्याचे कर्मचारी सांभाळत आहेत. दुकानाच्या चकरा मारत असलेल्या व्यापाऱ्यांना त्याच्या दुकानातील कर्मचारी मालकाची माहिती नसल्याचे सांगत आहेत.
...............