नागपूर : संकटातील शेतकऱ्यांना मदतीची राज्य सरकारने फक्त घोषणा केली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या नशिबी तातडीची मदतही नाही. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना काहीच नाही, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. सोमवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरून नागपुरात पोहचल्यानंतर दानवे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दानवे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतात राहण्याच्या घोषणेचा समाचार घेत आधी शेतकऱ्यांना मदत गरजेची असल्याचे म्हटले. शिंदे गट-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना एक नव्हे, तीन-तीन वेळा अतिवृष्टीचा फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. मात्र सरकारचा फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे. कर्जमाफीच्या नावाखाली केवळ कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ३० हजार प्रकरणे आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दावे फेटाळले जात आहेत. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या गुरांच्या मोबदल्यासाठी पोस्टमार्टेम रिपोर्ट मागितला जात आहे. वास्तविक सरकारनेच याची गरज नसल्याचे म्हटले आहे. यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कन्हेरे, राजू हरणे, नितीन तिवारी आदी उपस्थित होते.
नागपूरचा अपेक्षित विकास नाही
नागपूरच्या विकासाबाबत मोठमोठे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित विकास झाला नसल्याचे दानवे म्हणाले. स्वतंत्र विदर्भाबाबत विचारणा केली असता नागपूर वगळता विदर्भाचा विकास दूर आहे. नागपूरच्या मिहानमध्ये उद्योग आले नाहीत. मागील सरकारमधील उद्योग मंत्र्यांचा बचाव करीत दानवे यांनी स्थानिक नेत्यांचे यासाठी विशेष प्रयत्न नसल्याचे म्हटले.