नागपूर : कोट्यवधीचा गंडा घालून फरार झालेले ठगबाज सुनील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे आणि भरत शंकर साहू हे तिघे पोलिसांना सापडेनासे झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना त्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. सीताबर्डी परिसरात आरोपी कोल्हे बंधू आणि साहू यांनी एजीएम कार्पोरेशन, एजीएम डिजिटल लिमिटेड, जनसेवा बेनिफिट लिमिटेड आणि इतर कंपन्या उघडून १८ महिन्यात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले होते. आपल्या कंपनीत रक्कम गुंतविल्यास प्रत्येक महिन्याला अडीच टक्के मुद्दल आणि अडीच टक्के व्याज असे पाच टक्के सलग ४० महिन्यांपर्यंत देण्याची हमी आणि त्यावर बोनस देण्याचे आमिष आरोपी दाखवत होते. त्यामुळे नागपूर, महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातीलही अनेकांनी या ठगबाजांच्या कंपन्यात कोट्यवधी रुपये गुंतविले. दरम्यान, गेल्या वर्षी आरोपींनी आपल्या कंपन्यांचा गाशा गुंडाळून नागपुरातून पळ काढला. नागेंद्रसिंग बाबूसिंग ठाकूर (रा. बैतूलगंज, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी ठाण्यात उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याचा तपास आहे. मात्र, सहा महिन्यांपेक्षा जास्त अवधी होऊनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषित करून पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.
--
कोंडावार पीडितांनाही आवाहन
मे. जगदंबा रियललिटर प्रा. लि.चा ठगबाज संचालक गोपाल कोंडावार याने अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. सध्या तो आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध कुणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---