नागपूर : सोने खरेदी करताना बिल घेणे आवश्यक आहे. देशातील उत्पादनाचा दर्जा आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) सातत्याने प्रयत्न करीत असल्याची माहिती भारतीय मानक वैज्ञानिक व ब्यूरोचे प्रमुख विजय नितनवरे यांनी दिली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि अखिल भारतीय मानक ब्यूरोतर्फे संयुक्तपणे आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर ग्राहक पंचायतचे शहर अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते व जिल्हा अध्यक्ष प्रवीण शर्मा उपस्थित होते.
नितनवरे म्हणाले, ग्राहकांच्या संरक्षणावर अधिक भर देण्यासाठी सरकारने सामान्यांच्या उपयोगातील अधिकाधिक वस्तू मानक ब्यूरोच्या अनिवार्य प्रमाणन योजनेत समाविष्ट केल्या आहेत. आरोग्य, सुरक्षा आणि ऊर्जा संरक्षणदेखील यात आणले आहेत. मानक ब्यूरो प्रमाणन योजनेत खाण्याचे रंग, दूध पावडर, सिमेंट, एलपीजी गॅस सिलिंडर, वनस्पती खाद्यतेल, वनस्पती तुपाच्या पिशव्या, रेडिमिक्स कॉन्क्रिट प्लॅन्ट, मोबाईल, लॅपटॉप, बॅटरी, ड्रायसेल, विजेचा दिवा, इस्त्री, शेगड्या, वीज, वॉटर हिटर आदी बीआयएस करणे सक्तीचे आहेत.
संशोधक पीयूष वासेकर यांनी सोन्याची शुद्धता, वजन, दर्जा, मूल्याबाबत घ्यायची माहिती, फसवणूक, तक्रार आणि सोडवणूक याबद्दल कायदेशीर माहिती दिली. १ जून २०२१ पासून सोने व चांदीकरिता हॉलमार्किंगची सक्ती करण्यात येणार आहे. २२ कॅरेट सांगून १८ कॅरेट सोने दिले तर दुप्पट परतावा द्यावा लागेल. याकरिता खरेदी करताना ग्राहकांनी बिल घ्यावे.
ब्यूरोचे विभाग अधिकारी गणेश कोहाळ यांनी भारतीय मानकाची हॉलमार्किंग योजना, या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्तविक ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव संजय धर्माधिकारी यांनी केले. संचालन संध्या पुनियानी यांनी तर दत्तात्रय कठाळे यांनी आभार मानले. या प्रसंगी अॅड. गौरी चांद्रायण, स्मिता देशपांडे, गजानन पांडे, तृप्ती आकांत, सुधांशू दाणी, प्रमोद भागडे, गणेश शिरोळे, श्रीपाद हरदास, श्रीपाद भट्टलवार, नैना देशपाडे, अजय काठोळे, विनोद देशमुख, अॅड. विलास भोसकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.