निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या संख्येने आलेल्या टोळाच्या आक्रमणामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हजारो हेक्टर जमिनीवरील पीक क्षणात फस्त करण्याची व हिरवाई नष्ट करण्याची क्षमता असलेल्या टोळ किड्यांवर नियंत्रण मिळविले नाही तर मोठे संकट येऊ शकते. हे टोळ किंवा पिकांवरील इतर कीड व त्यांची अंडी हे अनेक प्रजातीच्या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. दुर्दैवाने कीटनाशकाचा वापर किंवा शेताजवळची वृक्षवल्ली कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी पक्षी संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.अनेक पक्षी अभ्यासकांनी पक्ष्यांचा अभ्यास करून हे अनेक प्रजातींचे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र कसे आहेत, हे सिद्ध केले. पक्षी अभ्यासक नितीन मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष्यांच्या अन्नात फार मोठ्या प्रमाणात कीटकांचा भरणा असतो. शाकाहारी असणारे अनेक पक्षी मांसाहारीसुद्धा असतात. अनेक प्रजातींचे पक्षी त्यांच्या उड्डाणमार्गात माणसांच्या अन्नावर डल्ला मारणाºया या टोळाचा नाश करतात. तसेच शेत खणून त्यातील हजारो, लाखो अंडी आणि स्थित्यंतराच्या काळात असलेल्या टोळांचा फडशा पडतात. पांढरा करकोचा हा असाच टोळसंहारक पक्षी आहे. भोरडी व त्याचे पिल्ले मध्य आशियात या टोळांवर जगतात. आपल्या जवळच्या चिमण्या आणि मैना हे पक्षी देखील दाणे खण्यासह मांसाहारी असून दिवसाला टोळांची लाखो अंडी आणि टोळीचा नायनाट करू शकतात. इंडियन रॉबिन हा पक्षीदेखील टोळ किड्यांचे सुरवंट नष्ट करतो. दुर्दैवाने आज या पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे. शेतात कीटनाशकांच्या फवारनीने पक्षी देखील मृत्युमुखी पडत आहेत. शिवाय शेताच्या आसपासची झाडे कमी झाल्याने पक्ष्यांचा अधिवास नाहिसा झाला आणि ते दिसेनासे झाले आहेत. टोळधाडीमुळे पुन्हा एकदा पक्ष्यांच्या संवर्धनावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.पक्षी अनेक खेपा करून खातात किडेमैनेची एक जोडी २४ तासात ३७० व त्यापेक्षा जास्त खेपा करून टोळ, गवती टोळ व इतर किडे आपल्या घरट्यात नेते व पिल्लांना खाऊ घालते. एका खेपेत १५-२० टोळ घेऊन जाण्याची क्षमता तिच्यात असते. चिमण्या २२० ते २६० खेपा करून मऊ शरीराचे किडे किंवा टोळ किड्यांचे सुरवंट दररोज आणतात. जर्मनीतील वलगुणी पक्ष्याची एक जोडी व तिची पिल्ले दरवर्षी १२० दशलक्ष कीटक, अंडी किंवा १.५० लाख सुरवंट आणि कोष यांचा नाश करतात. काही पक्षी शेत खणून टोळ किड्यांची लाखो अंडी व सुरवंट फस्त करतात.टोळमध्ये पृथ्वीची हिरवळ नष्ट करण्याची क्षमताटोळ मादी आपली अंडी जमिनीत छोट्या डबीत घालते. कॅप्सूलवजा कवचाच्या एका डबीत मादीची १०० अंडी असतात. दक्षिण आफ्रिकेत एका ठिकाणी १३३५ हेक्टरच्या शेतात टोळांची १४ टन अंडी एकदा उत्खननात आढळल्याची माहिती आहे. या अंड्यातून १२५० दशलक्ष टोळ जन्माला आले. या प्राण्यांची धाड पडली तर जमिनीच्या एखाद्या हिरव्यागार पट्ट्याचे पडीक जमिनीत रूपांतर होऊ शकते. यावर नियंत्रण केले नाही तर पृथ्वीची हिरवाई नष्ट करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या टोळीने वारंवार स्वत:मध्ये बदल केला असून ते अधिक सक्षम झाले असून कीटकनाशकांचाही त्यांच्यावर परिणाम होत नसल्याची शक्यता मराठे यांनी नोंदवली.