गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अंबाझरी जैव विविधता उद्यानात देशी -विदेशी पक्ष्यांची रेलचेल आहे. पक्षी अभ्यासकांना येथे मोठी संधी आहे. असे असले तरी वन विभागाने बर्ड पार्क म्हणून जाहीर केलेल्या या जैव विविधता उद्यानात शुल्क भरून माणसे फिरतात. माणसांच्या येथील मुक्ततेला आवर घालणारी यंत्रणा या उद्यानाकडे नाही. परिणामी येथील पक्षीजीवन विचलित होत आहे. त्यामुळे ‘जरा समजून घ्या धोका’अशी विनंती करण्याची वेळ येथील पक्ष्यांवर आली आहे.
दोन वषार्पूर्वी अंबाझरी जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन झाले. या उद्यानाचा विकास करण्याच्या हेतूने आणि तो अधिक लोकाभिमुख करण्यासाठी नागरिकांना फिरण्यासाठी ट्रॅक तयार करण्यात आले. आता सकाळ सायंकाळ तिथे गर्दी वाढलेली दिसते. या जैवविविधता पार्कमध्ये हौशी नागरिक संगीताचा आणि इलेक्ट्रॉनिक वाद्यांचाही आनंद लुटतात. शुल्क घेऊन नागरिकांना प्रवेश दिला जातो. त्यांना फिरण्यासाठी सायकली आणि बसण्यासाठी आत बाकडे आहेत. नागरिक थेट आत शिरून आनंद लुटतात. शुल्क घेतले जात असल्याने व त्यातून उत्पन्न वाढवायचे असल्याने या प्रकारावर नियंत्रण नाही. परिणामी पक्ष्यांची प्रायव्हसी धोक्यात येत आहे. बर्ड पार्क मध्ये माणसांचीही गर्दी वाढत असल्याने पक्ष्यांचा मुक्त संचार मर्यादित होऊ पहात आहे. जैविविधतेमुळे पक्षी अभ्यासकांसाठी हे उत्तम ठिकाण असले तरी अलिकडे वनपर्यटन घोषित झाल्यापासून पक्ष्यांच्या मुक्त अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
२०१७ मध्ये या उद्यानात पक्षी मोठ्या संख्येने असल्याचे आम्ही अनुभवले होते. आता फरक जाणवत आहे. वन विभागाने बर्ड पार्क म्हणून घोषित केले असूनही वन पर्यटनाच्या नावाखाली त्यात माणसांचा अधिवास वाढविला जात आहे. यामुळे येथील पक्षी अधिवासाचा ऱ्हास होत असल्याची बाब वनविभागाने गंभीरपणे घ्यायला हवी.
- डॉ. अर्चना मेश्राम, पक्षी अभ्यासक
या जैव विविधता उद्यानावर वन विभागाचे म्हणावे तसे नियंत्रण नाही. पर्यटनाच्या नावाखली दिलेली सूट पक्ष्यांसाठी भविष्यात पक्ष्यांसाठी धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्याचे परिणाम आतापासूनच जाणवायला लागले आहे. वेळीच विचार केला तरच हे निसर्गवैभव वाचविता येईल.
- विनित अरोरा, पक्षी अभ्यासक
...