नागपूर : दरवर्षी अतिउत्साही पतंगबाज वापरत असलेला नायलाॅन मांजा शेकडाे पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरताे. झाडांवर, वीजेच्या तारांवर अडकलेल्या तीक्ष्ण मांजात अडकून मुके पक्षी मरतात किंवा जायबंदी हाेतात. हा मांजा माणसांसाठीही घातकच ठरताे. यामुळे पतंगबाजांना नायलाॅन मांजापासून परावृत्त करण्यासह जखमी पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी तरुण पक्षीरक्षक सज्ज झाले आहेत.
नायलाॅन मांजा न वापरण्याचे आवाहन करूनही नफा कमाविण्यासाठी व्यापारी ताे विकतातच आणि आपल्या क्षुल्लक आनंदासाठी पतंगबाज ताे खरेदीही करतात. मात्र हा मांजा अवकाशात मुक्त विहार अनभिज्ञ चिमुकल्या जीवांसाठी घात करणारा ठरताे. मुक्या पक्ष्यांची ही जीवहानी थांबविण्यासाठी ‘अँग्री बर्ड’ ग्रुपचे तरुण दरवर्षी काम करीत असतात. यावर्षीही ते सज्ज झाले आहेत पण यावेळी वेगळ्या तयारीने. यावेळी हे पक्षीरक्षक जनजागृती तर करणारच आहेत पण यासाेबत नायलाॅन मांजा विकणारे व वापरणाऱ्यांवर वाॅच ठेवून प्रशासनाला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्नही करणार आहेत. या तरुणांनी पक्ष्यांसह माणसांना बळीजाण्याासून वाचविण्यासाठी धाेरण आखले आहेत. ग्रुपचे समन्वयक डाॅ. अभिक घाेष यांनी याबाबत लाेकमतला माहिती दिली.
व्हाॅट्सअप ग्रुपद्वारे जुळले १५० पक्षीमित्र
- पक्षीरक्षकांनी ‘अँग्री बर्ड’ हा व्हाॅट्सअप ग्रुप तयार केला असून त्याद्वारे शहरातील पक्षीमित्रांना एकत्रित केले जात आहे. यामध्ये १५० च्यावर पक्षीमित्र एकत्रित आले आहेत. हे सर्व शहरातील वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत.
- शहरातील वेगवेगळ्या भागात ग्रुपचे सदस्य बॅनर, पाेर्स्टससह जनजागृतीद्वारे नायलाॅन मांजा न वापरण्यासाठी आवाहन करणार आहेत. साेबतच इतवारीसारख्या व्यापारी क्षेत्रात व्यापाऱ्यांना जीवघेणा मांजा विक्री करण्यापासून परावृत्त करतील.
- त्यानंतर संक्रांतीच्या काळात जखमी पक्ष्यांना अडकलेल्या मांजातून सुखरूप काढण्यासाठी प्रशिक्षकांकडून ट्रेनिंगचे आयाेजन करण्यात आले आहे.
- संक्रांतीत शहरात सर्वत्र हे पक्षीरक्षक सज्ज राहतील. जखमी पक्ष्यांना अडकलेल्या मांजामधून काढण्यापासून तातडीने उपचारासाठी पाेहचविण्यापर्यंतची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- पशुवैद्यकीय डाॅक्टरांशी सामंजस्य करार करून जखमी पक्ष्यांवर नि:शुल्क उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
- नायलाॅन मांजाने जखमी झालेल्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा लाेकांसमाेर मांडण्यात येईल.
- सर्वात शेवटी संक्रांतीनंतर संपूर्ण टीम झाडांवर, वीजेच्या तारांवर अडकलेला मांजा काढण्यासाठी माेहीम राबविणार आहेत.