मेडिकलमधील अजब प्रकार : पालकांना सहन करावा लागतोय मनस्तापनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील अजब कारभारामुळे जन्म-मृत्यूच्या नोंदणीचा अर्ज आठवड्यानंतर तर काहींचा वर्षभरानंतर अभिलेखागार कार्यालयात मिळत आहे. परिणामी, अनेक पालकांवर संबंधित विभाग ते अभिलेखागार कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ येत आहे. धक्कादायक म्हणजे जन्मलेला बालकाच्या अर्जातील नावात, लिंग, जन्मतारखेत चुका राहत असल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात रोज सुमारे १५ च्यावर बालके जन्माला येतात. नियमानुसार ७२ तासांच्या आत या विभागातून जन्माचा अर्ज मेडिकलच्या अभिलेखागारमध्ये पाठविणे बंधनकारक आहे. अभिलेखागारमध्ये याची नोंद झाल्यावर हे अर्ज महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयात प्रमाणपत्रासाठी पाठविले जातात.परंतु स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात रोज बालके जन्माला येत असले तरी त्यांच्या जन्माचे अर्ज रोज न पाठविता आठवड्यातून एकदा पाठवितात. यामुळे अनेक घोळ निर्माण होतात. यातच काहींचे अर्ज पाठविणे राहून जातात, ते वर्षभरानंतर मिळतात. याशिवाय नावात बदल, लिंग बदल, जन्मतारखेत बदल अशा अनेक चुका राहतात. याची माहिती अभिलेखागार कार्यालयाने वारंवार संबंधित विभागाला पत्रातून दिली, परंतु उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याचा फटका पालकांना बसत असून, त्यांना वेळेत जन्म प्रमाणपत्र मिळत नसल्याने न्यायालयाचा त्रासही सहन करावा लागतो. चूक दुरुस्तीसाठी लागले सात महिनेमेडिकलमध्ये दीपाली टिपले यांनी एका मुलीला जन्म दिला. परंतु स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी मुलीच्या जन्माच्या अर्जावर ‘फिमेल’ ऐवजी ‘मेल’ असे लिहिले.अभिलेखागार कार्यालयातून हा अर्ज मनपाच्या हनुमाननगर झोन क्र. ३ कार्यालयात नोंदणीसाठी गेला. मुलीच्या जन्माचा दाखला घेण्यासाठी वडील अमोल टिपले झोन कार्यालयात गेले असता त्यांना जन्माच्या प्रमाणपत्रात मुलगा लिहिल्याचे आढळून आले. धक्कादायक म्हणजे ही चूक दुरूस्त करण्यासाठी त्यांना मेडिकलच्या कित्येक चकरा माराव्या लागल्या. त्यानंतरही तब्बल सात महिन्यांचा वेळ लागला.घोळाला विभाग जबाबदार - तांबुसकरया घोळाला केवळ संबंधित विभाग जबाबदार असल्याचा आरोप अभिलेखागार कार्यालयाचे कक्षप्रमुख तांबुसकर यांनी केला आहे. ते म्हणाले, डॉक्टरांनी लिहून पाठविलेलेच अहवाल आम्ही नोंदणीसाठी मनपाकडे पाठवितो. या घोळाबद्दल अधिष्ठात्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जन्माची नोंदणी वर्षभरानंतर
By admin | Published: March 28, 2017 1:46 AM