गुन्हेगाराच्या कृत्याने परिसर हादरलानागपूर : गुन्हेगारांचे नंदनवन ठरलेल्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांनी रविवारी दुपारी एकाची निर्घृण हत्या केली. प्रकाश सखाराम गडारिया (वय २७) असे मृताचे नाव असून, तो हिवरीनगरात राहात होता. हिवरीनगर झोपडपट्टीतच राहणारा आरोपी गगन नाशिक पाटील (वय २२) गर्दुला आहे. गर्दच्या व्यसनापोटी तो कोणतेही गुन्हे करतो. रविवारी दुपारी २ च्या सुमारास त्याला गर्दची तलफ आली. त्यामुळे तो याला त्याला पैसे मागू लागला. तो गुन्हेगारी वृत्तीचा असल्यामुळे त्याला एकाने ५० रुपये दिले. तर मृत प्रकाश आणि त्याचा भाऊ दिलीप या दोघांनी १०० रुपये दिले. मात्र तेवढ्यात शौक भागणार नाही, असे म्हणत आरोपी त्यांना पुन्हा पैसे मागू लागला. त्यावरून त्याचा प्रकाशसोबत वाद झाला. हाणामारीनंतर तो घरी गेला. घरून त्याने सब्बल आणली आणि प्रकाशच्या डोक्यात घातली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. झोपडपट्टीतील नागरिकांनी भीतीपोटी आरोपीला पकडण्याचे धाडस दाखवले नाही. नंदनवन ठाण्यात माहिती दिली. मात्र, पोलीस पोहचेपर्यंत आरोपी पळून गेला होता. गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (प्रतिनिधी)वरिष्ठ दखल घेणार काय? विशेष म्हणजे, नंदनवनमध्ये पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, मोकाट सुटलेले गुन्हेगार सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. एका शेतकऱ्याचे १ लाख ६० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. या घटनेची शाई वाळत नाही तोच आता दिवसाढवळ्या एका गुन्हेगाराने हत्या केली. वरिष्ठ अधिकारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या कारभाराकडे गंभीरपणे बघायला तयार नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्याचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नंदनवनमध्ये भरदिवसा हत्या
By admin | Published: December 21, 2015 3:01 AM