नागपूर: पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथील पेंच नदीच्या पात्रात सोमवारी सकाळी मित्रांसोबत आंघोळीकरिता उतरलेल्या नागपूरच्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीयूष संजय रेणके (१८, रा. भोलेबाबा नगर, उदयनगर रिंग रोड, नागपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
मृत पीयूषसह ७ मुले मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी पारशिवनी तालुक्यातील श्रीक्षेत्र घोगरा महादेव परिसरात आले होते. हे सर्व १२व्या वर्गातील विद्यार्थी असून, त्यांचा नुकताच निकाल लागला होता. त्यामुळे, मित्राचा वाढदिवस व १२ वी पासची पार्टी अशा दुहेरी भूमिकेतून ते आनंद साजरा करण्याकरिता नागपूर येथून सकाळी ६ वाजता निघाले. पारशिवनी परिसरातील बारई समाज तलाव (छोटा गोवा) परिसरात ते ७:३० च्या सुमारास पोहोचले. हा परिसर फिरल्यानंतर ते पेंच नदीपात्रातील श्रीक्षेत्र घोगरा महादेव परिसरात ९:३० वाजण्याच्या सुमारास आले. येथील पेंच नदी परिसर फिरल्यानंतर ते देवस्थान परिसरापासून ३०० मीटर अंतरावरील चोखली डोहाकडे आले. येथे आंघोळ करण्याकरिता पीयूष व त्याचे दोन मित्र पाण्यात उतरले.
अशातच तिघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे पाण्याबाहेरील युवकांनी दोघांना बाहेर ओढले. पीयूष त्यांच्यापासून लांब असल्याने त्याच्यापर्यंत कुणीही पोहोचू शकले नाही आणि त्यातच तो पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी १० च्या सुमारास घडली. घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. तहसीलदार हनुमंत जगताप, पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे, उपनिरीक्षक शिवाजी मुंढे यासह पोलिस व महसूल कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नावाड्यांच्या मदतीने मृतदेह नदीत शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, दुपारी ३ वाजेपर्यंत मृतदेह हाती लागला नाही. त्यामुळे, एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मृतदेह मिळाला नव्हता. पुढील तपास पारशिवनी पोलिस करत आहेत.