नागपूर : २०१४ मध्ये १५ हजार रुपयाची लाच घेणारे नागपुरातील भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) शास्त्रज्ञ बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांना विशेष सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व तब्बल एक लाख दहा हजार रुपयाचा दंड ठोठावला.
जांभूळकर यांच्याविरुद्ध वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उद्योजक अशफाक अली उस्मान अली यांनी तक्रार केली होती. अली यांची वर्धा येथे बाबूजी ॲक्वा नावाची फॅक्टरी होती. या फॅक्टरीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बॉटल तयार केल्या जात होत्या. बॉटलमधील पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यामुळे भारतीय मानक ब्यूरो अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये फॅक्टरीवर छापा मारून कायदेशीर कारवाई केली होती. तसेच, अली यांच्याविरुद्ध वर्धा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला होता. या न्यायालयाने २० डिसेंबर २०१४ रोजी अली यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. त्यानंतर जांभूळकर यांनी अली यांना कार्यालयात बोलावून या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल करण्याची व हे प्रकरण दिल्लीपर्यंत नेण्याची धमकी दिली आणि असे न करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच मागितली. अली यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दाखविल्यामुळे १५ हजार रुपयात सौदा पक्का झाला. परंतु, अली यांना ही रक्कमही द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी सीबीआयकडे धाव घेतली होती. ९ मार्च २०१५ रोजी सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने सापळा रचून जांभूळकर यांना १५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले.
सीबीआयने १५ साक्षीदार तपासलेसीबीआयने प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर जांभूळकर यांच्याविरुद्ध २६ फेब्रुवारी २०१६ रोजी विशेष सत्र न्यायालयात खटला दाखल केला. दरम्यान, सीबीआयने न्यायालयात १५ साक्षीदार तपासले व ९१ कागदोपत्री पुरावे सादर केले. त्यावरून जांभूळकर या गुन्ह्यामध्ये दोषी आढळून आले.