नागपूर : हप्ता वसुलीसाठी बीअर शॉपीत आग लावणाऱ्या बिट्स टोळीचा सदस्य चेतन तेलंग ऊर्फ डायना याच्याविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ‘लोकमत’ने सत्यस्थिती पुढे आणली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नंदनवन पोलिसांना फटकारले. परिणानी पोलिसांनी डायनवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
न्यू बालाजीनगर येथील रहिवासी अतुल जायसवाल यांच्या गुरुदेवनगर येथील बीअर शॉपीत ९ मार्चच्या रात्री आग लावण्यात आली होती. डायना अनेक दिवसांपासून उधारीत बीअर मागून जायसवाल यांना त्रस्त करीत होता. उधार न दिल्यास तेथील कर्मचाऱ्यांना धमकी देत होता. ९ मार्चला त्याने बीअर शॉपीत गोंधळ घातला. ‘मै यहा का डॉन हू, मुझे बिअर दे दे, तू आज देख, मै क्या करता हू’अशी धमकी त्याने दिली होती. जायसवाल शॉपी बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्री १.२० वाजता त्यांना बीअर शॉपीजवळ राहणाऱ्या शेजाऱ्याचा फोन आला. त्याने आग लागल्याची सूचना दिली. आगीत चार लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर जायसवाल यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी विम्याच्या रकमेसाठी आग लावल्याची शंका उपस्थित केली होती.
डायनाविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तो क्रिकेटची सट्टेबाजीही करतो. बिट्स टोळीच्या मोठ्या क्रिकेट सट्टेबाजांसाठी पैसे वसूल करतो. बिट्स टोळीचा सूत्रधार स्वप्निल साळुंखे याला काही दिवसांपूर्वी एमपीडीए अंतर्गत तुरुंगात पाठविण्यात आले होते. त्यानंतर नंदनवन पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. ‘लोकमत’ने गुरुवारी सत्यस्थिती पुढे आणताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नंदनवन पोलिसांना फटकारले. त्यानंतर गुरुवारी सकाळी डायनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची माहिती कळताच तो फरार झाला. बिट्स टोळीचे सदस्य दक्षिण नागपुरात सक्रिय आहेत. त्यांना पोलीस, नेता आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींचे संरक्षण आहे. त्यांच्या मदतीमुळेच ते आतापर्यंत बचावले आहेत.
.............