नागपूर : राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी सकाळी नागपूरच्या व्हेरायटी चौकात जोरदार प्रदर्शन करत राज्य सरकारच्या पुतळ्याचं दहन केलं.
वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेक नेत्यांनी या निर्णयावरुन राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.
आज नागपुरात या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा पुतळा जाळून आंदोलन केलं. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करू पाहणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी पकडला होता. तानाशाही नहीं चलेगी.. नारे लावून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.
'महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही'
पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.