नागपूर : नागपूर महानगर नियोजन समितीची निवडणूक जवळ येत असल्याने भारतीय जनता पक्षाने यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय बंगल्यावर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र अद्याप या निवडणुकीबाबत काहीच हालचाली दिसून येत नाही. काँग्रेस अद्यापही झोपेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान शुक्रवारी ग्रामीणमधून एक अर्ज दाखल झाला आहे. सावनेर तालुक्यातील ग्रा.प. सदस्य रवींद्र चिखले यांनी त्यांचा अर्ज दाखल केला.महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीची व्याप्ती ही फक्त मेट्रोरिजन पुरतीच मर्यादित नसून त्याचा स्थानिक राजकारणावरही परिणाम होणार आहे. खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही निवडणूक होणार असल्याने भारतीय जनता पक्षाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक घेतली. त्यात जिल्हा परिषद सदस्यांसह भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीबाबत व्यूहरचनेवर चर्चा झाली. शहर आणि ग्रामीण मधून कुणाला उमेदवारी द्यायची यासह इतरही बाबींवर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहराचे उमेदवार ठरविण्याची जबाबदारी ही शहर भाजपकडे तर ग्रामीणमधील उमेदवार ठरविण्याची जबाबदारी ही ग्रामीण भाजपकडे देण्यात येणार आहे.
मेट्रोरिजन निवडणुकीसाठी भाजप सतर्क, काँग्रेस झोपेत
By admin | Published: April 18, 2015 2:27 AM