राजीव सिंह
नागपूर : महिला आरक्षणानंतर प्रभागाची स्थिती स्पष्ट झाली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी प्रभागात सक्रियता दाखविणे सुरू केले आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या इच्छुकांमध्ये भाजप व काँग्रेसची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी वाटताना या दोन्ही पक्षांची चांगलीच कोंडी होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीला विराम लागला होता. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशाच्या आधारे मंगळवारी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आता प्रशासन पुढच्या नियोजनाच्या कामाला लागले आहे. अजूनही निवडणुका कधी होतील, हे स्पष्ट नाही; परंतु महिला आरक्षणाची सोडत निघाल्याने इच्छुक सक्रिय झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी भाजप व काँग्रेसने इच्छुकांचे मत जाणून घेऊन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार भाजपकडे ३ हजारांवर इच्छुकांनी दावेदारी केली. काँग्रेसमध्येही १३०० च्या जवळपास कार्यकर्ता व नेत्यांनी फॉर्म भरले. बसपाने अजूनही प्रक्रिया सुरू केली नाही. भाजप सूत्रांच्या मते अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापणार असे सांगितले जात आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर अनेक जण निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षांत किमान १०० वर दावेदार आहे. हे सर्व काँग्रेसशी आघाडी होण्याची वाट बघत आहेत. आघाडी फिस्कटल्यास दोन्ही पक्ष दावेदारांना तिकीट देऊन मैदानात उतरविणार आहेत.
- मोठ्या पक्षांचे मोठे टेन्शन
भाजपच्या वरिष्ठांनी यापूर्वीच संकेत दिले की, ४० ते ५० टक्के नगरसेवकांची तिकिटे कापली जातील. यातील निष्क्रिय असलेल्यांना पार्टीने पहिलेच संकेत दिले आहेत. त्यामुळे असे नगरसेवक दुसऱ्या पक्षाकडे लक्ष ठेवून आहे. आरक्षणामुळे सक्षम महिला दावेदारांना अडचण जाणार नाही; परंतु पुरुष उमेदवारांना चिंता भेडसावत आहे. भाजप सर्वच १५६ जागांवर उमेदवार लढविणार आहे; पण इच्छुकांची संख्या लक्षात घेता भाजपचे टेन्शन वाढणार आहे.
- काँग्रेसमध्ये गटबाजीचे टेन्शन
यंदा मनपाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी कुठल्या स्तरावर जाते, हे येणारा काळच सांगेल; पण काँग्रेसने एकजूट होऊन सक्षम उमेदवाराला बळ दिल्यास निश्चितच जागा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या आशेवर आहे. आघाडी न झाल्यास पक्षाचे सक्षम उमेदवार स्वत:च्या स्तरावर मैदानात उतरतील.
- बसपासाठी अस्तित्वाची लढाई
उत्तर प्रदेशात बसपा अस्तित्वहीन झाली आहे. अशात मनपा निवडणूक बसपासाठी अस्तित्व सिद्ध करण्याची संधी आहे. बसपाचे केडर व्होट यंदा काय करतात, याचा खुलासा निवडणुकीदरम्यान होईल. एमआयएम उत्तर, मध्य, दक्षिण नागपुरातील काही मुस्लीमबहुल एरियात उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहे. अशात मुस्लीम लीगदेखील आपले अस्तित्व दाखविण्याच्या तयारीत आहे.