लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागपूर दौऱ्यात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र ‘कोरोना’च्या मुद्द्यावर राज्य शासन राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीवर बहिष्कार टाकला.महसूलमंत्र्यांची पत्रपरिषद आटोपल्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांजवळ आपली भूमिका मांडली. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, उपमहापौर मनीषा कोठे, भाजपचे ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, प्रसिद्धिप्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते.
‘कोरोना’ची साथ सुरू झाल्यापासून पालकमंत्री नितीन राऊत यांनी अनेकदा बैठका घेतल्या. पण, भाजपच्या आमदारांना निमंत्रण दिले नाही व विश्वासातदेखील घेतले नाही. आम्ही सुचविलेल्या उपायांना गंभीरतेने घेतले नाही. राज्य शासनाने भाजपची सत्ता असलेल्या महानगरपालिकांना वाºयावर सोडले आहे. याचा निषेध म्हणून आम्ही महसूलमंत्र्यांच्या आढावा बैठकीवर बहिष्कार टाकला, असे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी सांगितले.तुकाराम मुंढेंवर आरोपयावेळी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर परत एकदा टीकास्त्र सोडले. तुकाराम मुंढे हे वारंवार खोटे बोलत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून ते खूप काम करत असल्याचे चित्र उभे करत आहेत. प्रत्यक्षात नागपूरची स्थिती भयंकर आहे. रुग्ण बाधित होऊन दोन-दोन दिवसांनंतरही दाखल केले जात नाहीत व नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप गिरीश व्यास यांनी लावला. ८७३ कोरोनाबाधित रुग्ण दाखल होण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती रविवारी प्रशासनाने दिली. एकीकडे आयुक्त ६५० पलंग रिक्त असल्याचे एकीकडे सांगतात तर दुसरीकडे ८७३ रुग्ण दाखल का करू शकले नाहीत, असा प्रश्न नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी उपस्थित केला.