नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडण्यात भाजपला यश मिळाले. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडीच्या जवळपास २० मतांना सुरुंग लावत कॉंग्रेसने ऐनवेळी पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांना १७६ मतांनी मात दिली. निवडणुकीच्या आखाड्यात भाजपने मतांच्या बेरजेचे गणित बरोबर जुळविले व मतदानानंतर केलेला दावा खरा करून दाखविला.
नागपुरात ५५९ पैकी ५५४ मतदारांनी मतदान केले होते. मतगणनेदरम्यान बावनकुळे यांनी सुरुवातीलाच निर्णायक आघाडी घेतली होती. विजयासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित झाला होता. मतांच्या गणितानुसार महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षे मिळून २०६ मतं होती. तर भाजपचे मित्रपक्ष व गट मिळून ३२५ मतं होती. प्रत्यक्षात कॉंग्रेसने पाठिंबा दिलेल्या देशमुख यांना १८६ मतेच मिळाली. याचाच अर्थ महाविकास आघाडीची २० मतं स्पष्टपणे फुटल्याचे दिसून येत आहे. भाजपला ३६२ मतं मिळाल्याने इतर पक्षांची १७ मतेदेखील बावनकुळे यांच्याकडे वळविण्याचे भाजपचे नियोजन यशस्वी ठरले. भाजपाला अपक्ष व इतर पक्षांची मतेदेखील मिळाली आहेत. या पक्षांची १७ मतं भाजपकडे वळली. परंतु भाजपकडून मात्र सर्व फुटलेली सर्व मतं महाविकास आघाडीचीच असल्याचा दावा करण्यात येत आहे.
भाजपने अगोदरच केली होती तयारी
कॉंग्रेसचे नेते ज्यावेळी रवींद्र भोयर यांना पक्षात घेतल्याबाबत राष्ट्रीय पातळीवरील वक्तव्य देण्यात व्यस्त होते, तेव्हापासूनच भाजपने मतांचे गणित मांडून ठेवले होते. इतर पक्षांतील किती मते आपल्याकडे कशी वळतील याबाबत नियोजन झाले होते व संबंधितांशी संपर्कदेखील झाला होता. शिवाय आपली मतं फुटू नये यासाठी सर्व मतदारांना ‘सेफ हाऊस’मध्ये पाठवून भाजपने कुठलाही धोका न पत्करायचे धोरण अवलंबविले होते. कॉंग्रेसला नेमके स्वत:च्याच मतदारांना विश्वासात घेऊन योग्य संपर्क साधणेच जमले नाही. महाविकास आघाडी फुटलीच आहे. त्यांचे नेते केवळ दिसायलाच एक आहेत. शहरात तर कुठलीच आघाडी नाही. त्यांच्या घटकपक्षांनी व इतर मित्रांनी आम्हाला प्रत्यक्ष मदत केली आहे हे वास्तव आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी स्पष्ट केले.
भोयर यांचे एकमेव मतं कुणाचे ?
भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले व पक्षाचे निवडणुकीतील मूळ उमेदवार रविंद्र भोयर यांना एकच मत मिळाले. पक्षाच्या निर्देशाप्रमाणे मंगेश देशमुख यांनाच मी मत दिल्याचे भोयर यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. अशा स्थितीत त्यांचे एक मतं नेमके कुणाचे आहे हादेखील संशोधनाचाच विषय आहे. याबाबत राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात आहेत.
मतांचे गणित
उमेदवार - संख्याबळ - प्राप्त मते
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) - ३२५ - ३६२
मंगेश देशमुख (कॉंग्रेस समर्थित) - २०६ - १८