लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत परत एकदा ‘कोरोना’ने डोके वर काढले असून, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर ‘लॉकडाऊन’बाबत ‘अल्टिमेटम’च दिला आहे. गर्दी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून पुढाकार व संयम अपेक्षित आहे. भाजपतर्फे २३ फेब्रुवारी रोजी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राजकीय आयोजनांमधील गर्दी कशा पद्धतीने धोकादायक ठरू शकते यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता, हे विशेष.
राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात नेहमीच ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडताना दिसतो. अनेक जण स्वत:चे छायाचित्र यावे यासाठी ’मास्क‘देखील घालत नाहीत. मेळावे व संमेलनात तर कार्यकर्त्यांची प्रमाणाबाहेर जास्त गर्दी होते. अशास्थितीत ‘कोरोना’चे संक्रमण जास्त वेगाने होण्याचा धोका असतो. भाजपतर्फे २३ फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. इतर राजकीय पक्षांनीदेखील पुढील काही काळात राजकीय आयोजने, सभा, बैठका टाळणे गरजेचे झाले आहे. शिवाय पक्ष कार्यालयांमध्येदेखील गर्दी असते. त्यामुळे तेथेदेखील कार्यकर्त्यांनी गर्दी टाळली पाहिजे.