१०८ जागांवर विजयाची गुढी काँग्रेस, राष्ट्रवादीचे पानिपत शिवसेनेचाही बाण मोडलानागपूर : सातत्याने तिसऱ्यांदा मनपाची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपाने जागांचे ‘शतक’ साजरे करत मनपात झेंडा फडकविला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला नागपूरकरांनी भरभरून पावती दिली. भाजपाने थोड्याथोडक्या नव्हे तर १०८ जागांवर विजय मिळवित मनपावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. गटबाजीने ग्रासलेल्या काँग्रेसचे पुरते पानिपत झाले. फक्त २६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या घडाळ्यात तर फक्त एकच काटा शिल्लक राहिला. शिवसेनेचा बाणही लक्ष्य साधू शकला नाही. विशेष म्हणजे लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर मनपातदेखील विजय मिळवत विजयाची दुहेरी ‘हॅट्ट्रिक’देखील भाजपाने साजरी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात भाजपाचे उमेदवार निवडणुकांना सामोरे गेले. आ.अनिल सोले व शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्याकडे निवडणुकांची जबाबदारी होती. ‘मिशन १००’ असा संकल्प घेऊनच भाजपाने प्रचाराला सुरुवात केली होती. यंदा तिकिटे वाटताना पक्ष नेतृत्वाकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात आला व २४ नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले. यामुळे भाजपाला नुकसान होईल, असे अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत होते. मात्र पक्ष कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम होता. त्याचेच प्रतिबिंब निकालांमध्ये दिसून आले. कॉंग्रेसमध्ये ‘सन्नाटा’दुसरीकडे कॉंग्रेस शहर समितीच्या मुख्यालयासमोर शांतता होती. अपेक्षेहून दारुण पराभव झाल्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचा सूर होता. निवडणुकांच्या संपूर्ण कालावधीत कॉंग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वादच जास्त गाजले. मागील निवडणुकांत कॉंग्रेसने ४१ जागांवर विजय मिळविला होता. यंदा हा आकडा घटून २८ वर आला. ५० हून अधिक जागांवर विजय मिळविण्याचे दावे करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना या पराभवाने मोठा धक्का लागला आहे. केवळ २, १० व ३८ या प्रभागांत कॉंग्रेसला सर्व जागा मिळविण्यात यश आले. प्रफुल्ल गुडधे पाटील यांचा करिष्मा प्रभाग-३८ मध्ये चालला. मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली असतानादेखील कॉंग्रेसच्या ‘पॅनल’ने येथे एकहाती विजय मिळविला. बसपाचा हत्ती धावलाएकीकडे भाजपाची दमदार ‘बॅटिंग’ सुरू असताना दुसरीकडे बसपाच्या हत्तीने आपली कामगिरी कायम ठेवली. मागील वेळी १२ जागांवर बसपाने विजय मिळविला होता. यंदा प्रभाग पद्धतीमुळे बसपाला फटका बसेल असे अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र बसपाने चक्क १० जागांवर विजय मिळवित आश्चर्याचा धक्का दिला.दिग्गजांना धक्कादरम्यान, मनपा निवडणुकांत अनेक दिग्गजांना धक्का बसला तर अनेकांनी अनपेक्षितपणे विजय मिळविला. प्रभाग ३७ मधून कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि भाजपाचे दिलीप दिवे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. विकास ठाकरे यांचा २ हजार ९२९ मतांनी पराभव झाला. दुसरीकडे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांचा कॉंग्रेसचे बंटी शेळके यांनी प्रभाग १८ मध्ये १ हजार ८३३ मतांनी पराभव केला. भाजपाचे रमेश सिंगारे यांना प्रभाग ३३ मधून अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रेसचे मनोज गावंडे यांनी त्यांचा ३, ०३१ मतांनी पराभव केला.
भाजपा ‘शतक’पार!
By admin | Published: February 24, 2017 2:51 AM