नागपूर : कसबाच्या विजयाचा विरोधकांकडून खूप उदो-उदो केला जात आहे. मात्र, तेथील काँग्रेसचे उमेदवार हे केवळ सहानभूतीवर निवडून आले आहेत. येथे भाजपची मते कमी झाली नाहीत. ब्राह्मण समाज कधीही देश देव, धर्म, संस्कृती सोडून विचार करत नाही. कसबा मध्येही ब्राह्मण समाजाचे एकही मत कमी झाले नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.
पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, कसबाची जागा भाजप हरली असली तरी चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही भाजप जिंकली. त्याच दिवशी तीन राज्याचा निकाल आला असून त्यात भाजपचा विजय झाला. विरोधक कितीही एकत्र आले तरी विजय भाजपाचाच होणार असा दावा त्यांनी केला. वीज दरवाढीच्या मुद्यावर बोलताना, वीज नियामक मंडळाच्या सुनावणीत नेहमीच विरोध होतो. सरकार व नियामक मंडळ एकत्र बसून जनतेवर बोजा पडणार नाही असा निर्णय घेतला, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शरद पवारांनी निकाल पहावे
- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कदाचित देशातील तीन राज्याचे निकाल पाहिले नसावे. त्यांनी ते निकाल अगोदर पाहावे. संपूर्ण काँग्रेस साफ झाली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा केली. त्यानंतर हा काँग्रेसचा पराभव आहे. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात प्रवास योजना सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर नियमित प्रवास सुरू होतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.