"हिंमत असेल तर ठाकरेबाणा दाखवत कॉंग्रेसचा हात सोडा"
By योगेश पांडे | Published: March 27, 2023 05:28 PM2023-03-27T17:28:14+5:302023-03-27T17:29:45+5:30
भाजप प्रदेशाध्यक्षांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
नागपूर : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधी यांच्या विचारांशी सहमत नसल्याचे विधान केल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील यात उडी घेतली आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ठाकरेंनी कॉंग्रेसचा हात धरला होता. आता हिंमत असेल तर ठाकरे यांनी कॉंग्रेसची साथ सोडून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत आहेत. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे यांनी केवळ टीका केली, मात्र प्रत्यक्षात तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. पंतप्रधान मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा, माझ्या वडिलांच्या नावाने मते का मागताय असा सवाल ठाकरे यांनी केला होता. मात्र ठाकरे यांची तुलना पंतप्रधान मोंदीशी होऊच शकत नाही. ठाकरे यांनी उगाच वल्गना करू नये, २०२४ मध्ये त्यांची काय अवस्था होते ते पहावे, असे बावनकुळे म्हणाले.
- ठाकरेंना भ्रष्टाचाराविरोधात बोलणे शोभत नाही
सत्तेतून पैसा मिळवायाचा ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धर्म आहे, त्यांच्या मांडीवर जाऊन ठाकरे बसले. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलणे किंवा भ्रष्टाचाराची भाषा करणं ठाकरे यांच्या तोंडी शोभत नाही. त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. ठाकरे हेदेखील भ्रष्टाचारी आहेत व त्यांच्या बाजुला जे बसले आहेत, तेदेखील भ्रष्ट आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.