योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेच्या निवडणूकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्यापही जाहीर झालेले नसताना नागपुरात मात्र सर्वच्या सर्व सहाही जागा भाजपच लढणार असल्याचा दावा शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केला आहे. पुर्व नागपूरबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आभा पांडे आग्रही असताना भाजप शहराध्यक्षांनी केलेल्या या दाव्यामुळे त्यांना अपक्षच लढावे लागणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
कुकडे शनिवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते. नागपुरात महायुतीच्या घटकपक्षांकडून एक किंवा दोन जागांचा आग्रह होता. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी आभा पांडे यांनी तर पुर्व नागपुरातून निवडणूक लढणार असल्याचेच जाहीर केले आहे व त्या प्रचारालादेखील लागल्या आहेत. जर महायुतीतून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष लढण्याची त्यांची तयारी आहे. दुसरीकडे उत्तर नागपुरात भाजपकडे प्रभावी उमेदवार नसल्यामुळे ती जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात येते की काय अशा चर्चा सुरू होत्या. मात्र कुकडे यांनी सर्व चर्चांना विराम देत सहाही जागा भाजपच लढेल असे सांगितले. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात कमळासाठीच प्रचार करावा. २०१९ मध्ये भाजपच्या हातून दोन जागा गेल्या होत्या, मात्र यावेळी नागपुरातील सर्व जागांवर भाजपचेच उमेदवार जिंकून येतील असा दावादेखील त्यांनी केला.