नागपूर : विदर्भातील नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण १४२ ग्रामपंचायतीचे निकाल साेमवारी जाहीर झाले. त्यात सर्वाधिक ६१ ग्रामपंचायतींवर काॅंग्रेसने, १२ वर राष्ट्रवादी, ४ वर ठाकरे गटाने दावा केला आहे, तर भाजपनेही ६० जागांवर दावा केला असून शिंदे गटाने ११ जागांवर दावा केला आहे. साेबतच ११ जागांवर अपक्षाने बाजी मारली.
नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची सरशी, भाजप दुसऱ्या स्थानी
नागपूर जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात काँग्रेसने आघाडी घेतली. काँग्रेस समर्थित पॅनलचे ८ सरपंच विजयी झाल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या वतीने करण्यात आला आहे. काँग्रेसपाठोपाठ भाजप समर्थित पॅनलचे ५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे २, तर दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्थानिक पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी भाजप समर्थित पॅनलचे उमदेवार विजयी झाल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केला आहे. जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी निवडणुका पार पडल्या. यात कुही भिवापूर तालुक्यातील ६, कुही तालुक्यातील ८ आणि रामटेक तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात रामटेक तालुक्यातील पुसदा पुनर्वसन-१ आणि पुसदा पुनर्वसन-२ या ग्रापंचायतींची निवडणूक अविरोध झाली. या दोन्ही ग्रामपंचातींवर काँग्रेसच्या वतीने दावा करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८१.२४ टक्के मतदान झाले होते.
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या गावात भाजपचा झेंडा
भंडारा : जिल्ह्यात पार पडलेल्या १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना - शिंदे गटाने ११ ग्रामपंचायतींवर, तर काँग्रेसने नऊ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. साकोली तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित पॅनल विजयी झाले. जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. शिवसेना - शिेंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर समर्थित पॅनलने भंडारा विधानसभा क्षेत्रातील ११ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला, तर काँग्रेसने १९ पैकी नऊ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचे सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह मतदारसंघातील साकोली तालुक्यातील सिरेगाव टोला या एकमेव निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीत भाजप समर्थित पॅनलने झेंडा रोवला. ग्रामपंचायत निवडणूक निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयापुढे मोठी गर्दी झाली होती. उमेदवारांनी फटाके फोडून व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला.
गाेंदिया : तीन ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित पॅनल.
गोंदिया : जिल्ह्यातील एकूण सहा ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सोमवारी मतमोजणी करण्यात आली. सडक अर्जुनी तालुक्यातील श्रीरामनगर येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे पाच ग्रामपंचायतींच्या एकूण ४५ जागांसाठी गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव ९, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ९, भरनोली ९, सुकडी ८ व निंबा ग्रामपंचायतच्या १० जागांचा समावेश होता. यात डोंगरगाव, सुकडी आणि निंबा या ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित पॅनलने दावा केला आहे, तर भरनोली ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने विजयाचा दावा केला आहे. सिरेगावबांध ग्रामपंचायतवर अपक्ष सदस्य निवडून आले.
चंद्रपुरात भाजप आघाडीवर
चंद्रपूर : जिल्ह्यात एकूण ९२ ग्रामपंचायत निवडणुकीची निकाल लागला आहे. यामध्ये मूल तीन, ब्रह्मपुरी १, भद्रावती दोन, चिमूर ४, कोरपना २५, राजुरा ३०, तर जिवती तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये भाजपने काही ठिकाणी विविध पक्षांसोबत युती करीत ४७ जागा जिंकल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेसनेही ३९ जागांवर आपले उमेदवार आल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवावादी काँग्रेसने १२ जागांवर, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन जागांवर दावा केला आहे. दरम्यान, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टीनेही काही जागाा जिंकल्या आहे. जिल्ह्यात १० अपक्षांनी सरपंच पद मिळविले आहे. विविध राजकीय पक्ष सरपंच पदावर आपले दावे करीत आहेत. विशेष म्हणजे, सरपंच एका पार्टीचा आणि अन्य सदस्य दुसऱ्याच पार्टीचे असेही अनेक गावांमध्ये उदाहरण बघायला मिळत आहे. आज राजकीय पक्षांनी दावे केले असले तरी येणाऱ्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे.
वर्ध्यात भाजप-काँग्रेसला कौल
वर्धा : जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी मतमोजणीअंती जाहीर करण्यात आला. नऊही ग्रामपंचायतींचा विचार केल्यास भाजप समर्थित गटाने चार, तर काँगेस समर्थित गटाने चार ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. आर्वी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीवर नेमकी कुणाची सत्ता याबाबत सायंकाळपर्यंत संभ्रम कायम होता. एकूणच वर्ध्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व भाजपला मतदारांचा 'फिप्टी-फिप्टी' कौल राहिला.