नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना पाठिंबा द्यायचा की उमेदवार बदलायचा, यावर अद्याप भाजप निर्णय घेऊ शकलेली नाही. सकाळी गाणार, दुपारी राजेंद्र झाडे तर सायंकाळी सुधाकर कोहळे अशा नावांवर चर्चा झाली. पण रात्री पुन्हा ‘जैसे थे’वर विराम लागला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी धंतोलीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्या बैठकीत बहुतांश आमदारांनी शिक्षक परिषदेचे उमेदवार, विद्यमान आमदार नागो गाणार यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. पण गाणार हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. या बैठकीनंतर शनिवारीच भाजप आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी अपेक्षा होती. पण पक्षांतर्गत विरोधामुळे रविवारी रात्रीपर्यंतही भाजपकडून कुठलीच घोषणा झाली नाही. दरम्यान, गाणार यांच्या बदली कोणता उमेदवार द्यायचा, यावर दिवसभर पक्षांतर्गत खल सुरू राहिला. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना भाजपचा पाठिंबा द्यायचा का? यावरही गंभीर मंथन झाले. दुपारनंतर एकाएकी दक्षिण नागपूरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावावर चर्चा सुरू झाली. काही आमदारांनी पडद्यामागे कोहळे यांच्यासाठी जोरात फिल्डिंग लावली. अधूनमधून संजय भेंडे यांच्या नावाचाही विचार सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या. पण रात्रीपर्यंत काहीच निर्णय झाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमधील काही नेते भाजपने धाडसी निर्णय घेत उमेदवार बदलावा या विचाराचे आहेत. तर काही नेते आता या प्रक्रियेसाठी बराच विलंब झाला असल्याचे कारण देत गाणार यांनाच निवडणुकीला सामोरे जाऊ द्यावे, या मताचे आहेत. या सर्व पेचात भाजप अडकली असून, त्यामुळेच निर्णय लांबणीवर पडत आहे.
काँग्रेसमध्येही पडले दोन गट
- उमेदवार ठरविण्यासाठी रविवारीही काँग्रेसच्या गटात कुठल्याच हालचाली नव्हत्या. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबले यांच्यापैकी कुणाला समर्थन द्यावे, यावरून काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी काँग्रेस नेते एकत्र बसतील व यावर निर्णय घेतील. दरम्यान, सुधाकर अडबले हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, यंग टीचर्स असोसिएशनचे प्रमुख डॉ. बबनराव तायडे यावेळी उपस्थित राहतील, असे अडबले यांच्या समर्थनार्थ पाठविण्यात आलेल्या मेसेजमध्ये म्हटलेले आहे.