भाजपला १७ ते १८ टक्क्यांच्या पुढे मतं नाही, विजय वडेट्टीवार यांचा दावा
By कमलेश वानखेडे | Published: November 25, 2023 01:31 PM2023-11-25T13:31:45+5:302023-11-25T13:32:33+5:30
हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाणार
नागपूर : आमच्याकडे असलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपची मते १७ ते १८ टक्क्यांच्या पुढे जात नाही. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रयोग करण्यात आला. पण त्याचाही फायदा झालेला दिसत नाही. आता त्यांना भाजप चिन्हावर लढो हाच अखेरचा पर्याय असेल, असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी घेतला.
वडेट्टीवार म्हणाले, हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी आपल्याला दोन दिवसापासून कार्यकर्त्यांचे फोन येत आहे. मला छगन भुजबळ यांचा कॉल आला. ओबीसी हक्कासाठी आपल्यात मतभेद दिसू नये असे त्यांनी सुचवले. त्यामुळे मी या मेळाव्याला जाणार आहे. हा सर्वपक्षीय मेळावा आहे. भुजबळ यांनी देखील ओबीसीसाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. मी देखील ओबीसी साठी लढण्याची तयारी केली आहे. आम्हाला कुणाचेही नुकसान करायचे नाही. ओबीसी ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची भूमिका आहे.
फाईल अडवा आणि एकमेकांची जिरवा
- सरकार मधील तिघांची दिशा वेगळी आहे. दिल्ली ने समजाऊन सांगितले तरी एकमेकांच्या समोर जात नाही. फाईल अडवा आणि एकमेकांची जिरवा हा उद्योग सरकारमध्ये सुरू आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.