१७५२ बूथप्रमुखांच्या घरी झाल्या बैठका : नेत्यांना प्रभागनिहाय कामाला लावलेकमलेश वानखेडे नागपूरमहापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने ‘मास्टर प्लान’ आखला असून त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जात आहे. पक्षातर्फे तब्बल १७५२ बूथ प्रमुखांच्या घरी स्वतंत्र बैठका झाल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी प्रत्येक प्रभागात एक निरीक्षक नेमून जबाबदारी सोपविण्यात आली होती. निरीक्षकांनी ही जबाबदारी कितपत पार पाडली याचे अहवालही निरीक्षकांनी सादर केले आहेत. पदावर असलेली व्यक्ती व पदावर असलेल्या व्यक्तीकडून काम करवून घेण्यासाठी नेमलेला नेता अशा दोघांकडून काम करवून घेत त्यांच्या कामाचा लेखाजोखा फाईलबंद केला जात आहे. नागपूर शहरात भाजपने १८८७ बूथवर बूथप्रमुख नेमले आहेत. प्रत्येक बूथवर एका प्रमुखासह १० बूथ सदस्य नेमण्यात आले आहेत. या सर्व बूथ प्रमुखांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा कार्यक्रम पक्षाने आखला होता. त्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक यानुसार ७२ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. प्रत्येक प्रभागाच्या निरीक्षकाला संबंधित प्रभागातील सर्व बूथ अध्यक्षांच्या घरी जाऊन बैठका घेण्याचा कार्यक्रम सोपविण्यात आला. त्यानुसार १५ सप्टेंबरपर्यंत तब्बल १७५२ बूथ अध्यक्षांच्या घरी जाऊन निरीक्षकांनी बैठका घेतल्या. प्रत्येक बूथ प्रमुखाच्या घरी झालेल्या बैठकीत कोण कोण बूथ सदस्य उपस्थित होते, याशिवाय त्या परिसरातील इतर कोण मान्यवर नागरिक उपस्थित होते याची नोंद घेण्यात आली. या बैठकीत बूथ प्रमुखाला येणाऱ्या अडचणी, त्याला हवी असलेली मदत, संबंधित भागात पक्षाची स्थिती, त्या भागात असलेल्या नाागरी समस्या, विकासाचे प्रश्न, नगरसेवकाविषयीचे मत आदी माहिती घेण्यात आली. याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला. ३ हजार बूथ प्रमुखांची यादी तयारसध्या भाजपचे १८८७ बूथ प्रमुख आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्यामुळे बूथची संख्या वाढून तीन हजार होणार आहे. या वाढलेल्या बूथवर प्रमुख कोण असतील याचीही यादी भाजपने तयार केली आहे. सध्या असलेल्या बूथ प्रमुखांकडूनच नव्याने नेमायच्या अतिरिक्त बूथ प्रमुखांची यादी मागविण्यात आली आहे. निवडणूक आयोगातर्फे अधिकृतरीत्या तीन हजार बूथची यादी जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी भाजपचे बूथ प्रमुख जाहीर झालेले असतील, अशी तयारी शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी करून ठेवली आहे.
भाजपची इलेक्शन एक्स्प्रेस जोरात
By admin | Published: September 21, 2016 2:56 AM