नागपूर - गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार सत्तेवर आले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण, पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांऐवजी शिवसेनेत बंड करून भाजपाशी हातमिळवणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं. त्यामुळे भाजपाच्या राज्यभरातील समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच आता फडणवीसांचे घर असलेल्या नागपूरमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार नाराजी व्यक्त केली जात आहेत. तसेच फडणवीसांचं अभिनंदन करणाऱ्या बॅनरमधून भाजपाच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी अमित शाहांचे फोटो वगळले आहेत.
ठाकरे सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, याची राजकीय तज्ज्ञांसह कार्यकर्त्यांनाही खात्री होती. मात्र काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा फडणवीस यांनी केली आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. तर या सर्व घटनाक्रमामध्ये अमित शाहांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच नागपूरमध्ये देवेंद्र फणडवीस यांच्या अभिनंदनासाठी लावलेल्या बॅनरमध्ये नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत. मात्र भाजपामधील शक्तिशाली नेते असलेल्या अमित शाहांचा फोटो या बॅनरमध्ये नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामध्ये लिहिले आहे की, प्रिय देवेंद्र, तुझ्या त्यागाचे मोल मौल्यवान आहे. आपल्या गळ्यातील माळ एका क्षणात दुसऱ्याच्या गळ्यात घातली. आधी पक्ष नंतर मी हे, मूल्य तू खरे करून दाखवलेस, तुला मानाचा मुजरा.
तर अन्य एका बॅनरमध्ये लिहिले आहे की, प्रिय देवेंद्र तू कुठल्या मातीचा बनला आहेस यार. तुझ्यासमोर आम्ही खूप खुजे आहोत. तुला आमचा सलाम. दरम्यान, या बॅनरबाबत विचारले असता संदीप जोशी यांनी या बॅनरमध्ये पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे.