नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजपकडून शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांनाच समर्थन दिले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवार बदलण्यास आता बराच उशीर झाला आहे. त्यामुळे शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही, या मतापर्यंत भाजप नेते पोहोचले आहेत.
शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी धंतोलीतील विभागीय कार्यालयात नागपूर विभागातील खासदार व आमदारांची बैठक घेतली होती. तीत बहुतांश आमदारांनी गाणार यांना बदलण्यात यावे, अशी शिफारस केली होती. गाणार मात्र लढण्यावर ठाम होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी नागपूर महापालिका शिक्षक संघातर्फे आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते म्हणाले, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक शिक्षक परिषद लढवीत असते. त्यांना भाजप पाठिंबा देते. यंदा भाजपमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असले तरी याबाबत लवकरच निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावरून गाणार यांनाच भाजप पाठिंबा देईल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून आ. संजय कुटे प्रभारी
- शुक्रवारी भाजपतर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीत आ. मोहन मते यांची नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली होती. शनिवारी भाजपकडून जारी झालेल्या दुसऱ्या पत्रात याच मतदारसंघासाठी आ. डॉ. संजय कुटे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रमुख व प्रभारी यात फरक असून दोन्ही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्याचे स्पष्टीकरण भाजप नेते देत आहेत.
पटोले दिल्लीला रवाना, काँग्रेसची बैठक रद्द
- उमेदवार निश्चितीसाठी शनिवारी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीच्या कामासाठी सकाळीच विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले. त्यामुळे आता सोमवारपर्यंत बैठक होण्याची चिन्हे नाहीत. तसेही काँग्रेसने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतल्याचे चित्र नाही. समविचारी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करायचा, एवढेच सोपस्कार पार पाडण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसचे अडबाले यांना झुकते माप
- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने शिक्षक भारतीची मदत घेत शिक्षक मतदारसंघात समर्थन देण्याचा शब्द दिला होता. मात्र, याबाबत काँग्रेस नेते काहीच बोलायला तयार नाहीत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने स्वत:चा उमेदवार रिंगणात उतरविला होता. हा अपवाद वगळता काँग्रेसने त्यापूर्वीच्या तीन निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला समर्थन दिले होते. त्यामुळे जुनी आघाडी घट्ट करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सुधाकर अडबाले यांनाच समर्थन द्यावे, अशी भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून अडबाले यांना समर्थन जाहीर केले जाऊ शकते.