आॅनलाईन लोकमतनागपूर : माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाढविला. ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी संघर्ष केला. यातूनच तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने स्व.गोपीनाथ मुंडे ऊ स तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ नाही आणि कार्यालयही नाही हा गोपीनाथ मुंडे यांचा अवमान असून भाजपा त्यांना विसरला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतच्या प्रश्नावर मुंडे यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील यांना धारेवर धरत गोपीनाथ मुंडे याचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी केली. या महामंडळास विलंब झाला, अद्याप कार्यालय नाही, एकाही कामगाराला लाभ मिळालेला नसल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणले. अखेर हे कार्यालय एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.ऊस तोडणी कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने भाजपाने महामंडळ जाहीर केले होते. तेव्हा आम्ही सरकारचे अभिनंदन केले होते. पण तीन वर्षांपासून महामंडळाचे काम सुरू झालेले नाही. कार्यालय, कर्मचारी, लाभार्थी काहीच तरतूद नाही. ५ डिसेंबरच्या कॅबिनेट बैठकीत महामंडळ करण्याचा निर्णय घेतला असा आरोप मुंडे यांनी केला.ज्यांनी भाजपाला वाडी, वस्तीत नेले, त्याच गोपीनाथ मुंडे यांची उपेक्षा भाजपाने चालवली आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. तीन वर्षापूर्वी महामंडळाची घोषणा करण्यात आली. परंतु सरकार काहीच करीत नसल्याची टीका आ. विनायक मेटे यांनी केली. सदस्य अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांच्यासह इतर सदस्यांनी हा विषय उपस्थित केला होता.