नागपूर : भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत ओबीसी उमेदवार रिंगणात उतरविणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार भाजपाच्या जिल्हा कमिटीने निवडणुकीच्या मैदानात १६ ही ओबीसी उमेदवारांना संधी देत, ओबीसी प्रवर्गाची नाराजी दूर केली आहे. विशेष म्हणजे भाजपाने उमेदवारी देताना विरोधी पक्षनेत्याचीच तिकीट कापले. शिवाय काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १५ उमेदवार निवडून आणले होते. यात सर्वात ज्येष्ठ असणारे अनिल निधान यांना विरोधी पक्षनेत्याचे पद दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये निवडणूक आयोगाने त्यांचे पद रद्द केले आणि पोटनिवडणुकीत उमेदवारी देताना भाजपानेही त्यांना संधी नाकारली. त्यांच्या जागी योगेश डाफ या नवीन चेहऱ्याला मैदानात उतरविले. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत हरलेल्या दोन महिला उमेदवारांना पुन्हा मैदानात उतरविले. तर ९ नवीन चेहऱ्यांना यंदा संधी दिली आहे. यात जि.प.मध्ये उपाध्यक्ष राहिलेले सदानंद निमकर यांनाही भाजपाने अरोली मतदार संघातून रिंगणात उतरविले आहे.
- डिगडोहमध्ये उमेदवाराची पळवापळवी
डिगडोह सर्कलमध्ये गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुचिता विनोद ठाकरे यांनी भाजपाच्या रश्मी कोटगुले यांचा पराभव केला होता. परंतु पोटनिवडणुकीत भाजपाने उमेदवाराची पळवापळवी केली. राष्ट्रवादीच्या सुचिता ठाकरे भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरल्या. त्यामुळे रश्मी कोटगुले यांनी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीचे बोट धरून त्याच सर्कलमधून मैदानात उतरल्या. डिगडोहमध्ये झालेली पळवापळवी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.
- वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही सर्व जागांवर ओबीसी उमेदवार दिले आहेत. नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविला आहे. अनिल निधान यांनीच उमेदवारी नाकारल्यामुळे योगेश डाफ यांना संधी दिली आहे.
अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजपा