लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व महाराष्ट्र स्टेट ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रेल्वे स्टेशन रोडवरील परवाना भवन येथे कॉ. ए. बी. बर्धन तृतीय स्मृती दिवस जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ भाकप नेते कॉ. मोहनदास नायडू अध्यक्षस्थानी तर, लोकमत टाइम्सचे संपादकीय सल्लागार मेघनाद बोधनकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, मोहन शर्मा, राज्य सरचिटणीस श्याम काळे, डॉ. रतिनाथ मिश्रा, बीएनजे शर्मा, शंभुदयाल गुरू आदी व्यासपीठावर उपस्थित होते.२०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर बर्धन यांनी भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. हा केवळ सत्ताबदल नसून देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे ते म्हणाले होते. पुढे चालून त्यांचा प्रत्येक शब्द खरा ठरला. आता लवकरच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या परिस्थितीत बर्धन यांनी कोणते निर्णय घेतले असते याचा विचार करून पुढील वाटचाल करावी लागणार आहे. यावेळी लोकशाही विरोधकांना थांबवणे आवश्यक झाले आहे, असे अमरजित कौर यांनी पुढे बोलताना सांगितले.बर्धन हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते कोणतेही काम सक्षमपणे करीत होते. ते प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून बोलत होते. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राहत होते. त्यामुळे त्यांना विरोधकांनीही गुरूचे स्थान दिले होते, असे नायडू यांनी सांगितले.बर्धन यांना पत्रकारितेचे आकर्षण होते. त्यांचे विचार प्रभावी होते. देशाला आज त्यांच्या विचारांची गरज आहे, असे मत बोधनकर यांनी व्यक्त केले. अन्य मान्यवरांनीही समउचित विचार व्यक्त केले. बी. एन. मौर्य यांनी संचालन केले.
भाजप सरकार लोकशाहीविरोधी : अमरजित कौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:06 PM
भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे ए. बी. बर्धन स्मृती दिवस जाहीर सभा