भाजपा शासनाने केली झोपडपट्टीधारकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:11 AM2018-08-02T00:11:54+5:302018-08-02T00:12:45+5:30
झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्याच्या नावाखाली त्यांची मोठी फसवणूक भाजपा शासनाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. वास्तविक शासनाने चालविलेल्या या उपक्रमाचा झोपडपट्टीधारकांना लाभ होणार नाही, त्यामुळे निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ही दिशाभूल चालविल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपडपट्टीवासीयांना मालकी पट्टे देण्याच्या नावाखाली त्यांची मोठी फसवणूक भाजपा शासनाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. वास्तविक शासनाने चालविलेल्या या उपक्रमाचा झोपडपट्टीधारकांना लाभ होणार नाही, त्यामुळे निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ही दिशाभूल चालविल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
अतुल लोंढे यांनी सांगितले की, काँग्रेस आघाडी शासनाने प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना फोटोपास दिल्यानंतर पट्टे देण्यात यावे, असा अध्यादेश काढला होता. ११ जुलै २००१ शासन निर्णयानुसार नासुप्र व मनपाला या संबंधित सर्वेक्षण करून फोटोपास द्यायचे होते. परंतु, मनपा व नासुप्रकडून नागरिकांना आतापर्यंत फोटोपास देण्यात आले नाही. नासुप्रला पट्टे देण्याचा अधिकार नसून केवळ राज्य शासनच नागरिकांना मालकी पट्टे देऊ शकते. नवीन शासकीय अध्यादेशानुसार एनआयटी जमीन विनियोग नियम १९८३, मधील नियम २६ नुसार शासनास असलेल्या अधिकारात पट्टे देण्यात येतील, याचा अर्थ झोपडपट्टीत ओपन, पब्लिक युटीलिटी, रस्ता याच्यासाठी जागा सोडावी लागेल व त्यामध्ये अनेक गरिबांची घरे, झोपडे जातील व ते बेघर होतील. त्यांचे पुनर्वसन कसे करणार याचा कुठेही उल्लेख नसल्याने, शासनाने चुकीच्या पद्धतीने पट्टे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. आजवर ५३२ पट्टे वाटप झाले आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाली आहे. जर शासनाने नियमानुसार पट्टे वाटप केले नाही तर काँग्रेस कमिटी मोठे आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, नितीन साठवणे, प्रशांत धवड, डॉ. प्रशांत बनकर, राजेश माकडे, संदीप देशपांडे, शुभम मोटघरे, अर्चना सिडाम आदींची उपस्थिती होती.