नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बावनकुळे यांच्याबाबत बोलणाऱ्या शरद पवार यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे. त्यांच्या दलबदलू प्रवृत्तीमुळेच त्यांच्या जवळची माणसे सोडून गेली व त्यांचा पक्ष फुटला अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकीट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, असे वक्तव्य पवारांनी केले होते. यावरून महाराष्ट्र भाजपने पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष व विचार बदलला नाही. मात्र काही लोकांनी राजकारणात आल्यापासून पक्ष किती बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीने पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये. ज्या काँग्रेसने तुम्हाला पक्ष विरोधी कारवायांसाठी पक्षातून काढले त्याच काँग्रेससोबत पवार यांनी पुन्हा युती केली. ही कृती त्यांच्या कोणत्या स्वाभिमानात बसते? शरद पवार यांच्या याच खोट्या आणि दलबदलू प्रवृत्तीमुळे त्यांचा संपूर्ण पक्ष फुटला. जीवाभावाची माणसं सोडून गेली. ती का गेलीत याचे ते कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही असा सवाल भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.