नागपूर : राज्यात आलेल्या राजकीय भूकंपामागे भाजपच्या नेत्यांची मोठी भूमिका असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचे खंडन केले आहे. भाजपने कुणाचेही घर फोडलेले नाही. आमच्या पक्षाचे ते संस्कारच नाही. आम्ही कुणाकडे समर्थन मागायला गेलो नव्हतो व कुठलेही घर फोडलेले नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देशकल्याणासाठी मोदींनी जे कार्य नऊ वर्ष उभे केले, त्या कार्यकाळाचे संपर्क ते समर्थन मोहीम देशभरात सुरू आहे. अजित पवार व इतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी मोदींच्या कामाला समर्थन दिले आहे व म्हणूनच ते सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राजकारणात बेरजेला महत्त्व आहेच. तसे पाहिले तर हे फार मोठे पाऊल आहे. शिंदे, फडणवीस व पवार यांचा अनुभव राज्याच्या फायद्याचा ठरेल, असे बावनकुळे म्हणाले.
मोठी बातमी! जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना अपात्र ठरविण्यासाठी अजित पवारांचे पत्र
२०१९ मध्ये भाजपला बहुमत मिळाले होते. मात्र उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी षडयंत्र करून फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. पवार यांनी बहुमताचा खेळ केला होता व आता पेरलं तेच उगवलं आहे. मंत्रीपदासाठी कुणीही सोबत येत नाही. राजकारणात आमदार व खासदारपद महत्त्वाचे नाही. विकासदेखील महत्त्वाचा असतो व तेच अजित पवारांनी केले आहे. येत्या काळात पंतप्रधान मोदी यांना समर्थन देण्यासाठी आणखी लोक समोर येतील. त्या सर्वांचे आम्ही स्वागत करू, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.