नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या पाठोपाठ आता नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातही भाजपला जबरदस्त धक्का बसला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडात भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी एकतर्फी मात दिली.
अडबाले यांनी पहिल्या पसंतीची १६ हजार ७०० मते घेत विजयाचा कोटा पूर्ण केला. गाणार यांना ८ हजार २११ मते मिळाली. तर शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे ३ हजार ३५८ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर शिक्षकांमध्ये असलेला रोष, तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेले गाणार यांना न बदलल्यामुळे असलेली नाराजी व महाविकास आघाडीच्या मदतीने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने लावलेली ताकद यामुळे दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात असलेली जागा हिसकावण्यात महाविकास आघाडीला यश आले. रिंगणातील २२ उमेदवारांपैकी २० उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आली नाही. ३४ हजार ३६० शिक्षकांनी मतदान केले होते. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत २८ टेबलवर प्रत्येकी १ हजार मतपत्रिका याप्रमाणे २८ हजार मतांची मोजणी करण्यात आली. यापैकी २६ हजार ९०१ मत वैध ठरली तर १ हजार ९९ मत अवैध ठरली. पहिल्या फेरीत सुधाकर अडबाले यांना पहिल्या पसंतीची १४ हजार ६९ मते तर नागो गाणार यांना ६ हजार ३६६ मते मिळाली. राजेंद्र झाडे हे २ हजार ७४२ मतांवर थांबले. पहिल्याच फेरीत अडबाले यांनी मुसंडी मारताच मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांचा जल्लोष सुरू झाला. दुसऱ्या फेरीत ६ हजार ३६० मतपत्रिकांची मोजणी झाली. अडबाले यांनी विजयासाठी लागणारा पहिल्या पसंतीच्या १६ हजार ४७३ मतांचा कोटा पूर्ण केला. १६ हजार ७०० मते घेत ते विजयी झाले.
चौथ्या क्रमाकांवर अवैध मते
- मतमोजणीत एकूण तब्बल १ हजार ४१५ मते अवैध ठरली. अडबाले, गाणार, झाडे यांना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळाली. तर अवैध मतांची संख्या चौथ्या क्रमांकावर होती.
आप, बसपा, वंचित हजाराच्या आत
- आम आदमी पार्टी, बसपा व वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना नाममात्र मते मिळाली. ‘आप’चे देवेंद्र वानखेडे यांना ८६३ मते तर ‘वंचित’चे दीपपकुमार खोब्रागडे यांना ३७३ मते मिळाली. बसपाच्या निमा रंगारी यांना फक्त ६६ मते मिळाली. अपक्ष उमेदवार अजय भोयर यांनाच १ हजार मतांचा टप्पा ओलांडण्यात यश आले.